गडचिरोली : पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईचा ‘आझाद समाज पक्षा’ने तीव्र शब्दांत निषेध केला असून, केवळ आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, गुन्हे मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात एका गाण्यावर नृत्य सादर केले होते. हे गाणे जहाल नक्षलवादी हिडमा याच्याशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासकीय कारवाईवर सडकून टीका केली आहे. संबंधित गाणे युट्यूबवर सहज उपलब्ध आहे. जर हे गाणे इतकेच आक्षेपार्ह किंवा विघातक आहे, तर शासनाने ते तयार करणारा स्टुडिओ, गायक किंवा इंटरनेटवर ते प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, मुळात या गाण्यावर कोणतीही कायदेशीर बंदी नसताना केवळ त्यावर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणे, हा घटनात्मक मूल्यांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असे बन्सोड यांनी म्हटले आहे.
दडपशाहीचा आरोप
हे दोन्ही विद्यार्थी पुण्यात आपले भविष्य घडवण्यासाठी आले असून त्यांचा कोणत्याही विघातक विचारसरणीशी संबंध नसल्याचा दावा पक्षाने केला आहे. केवळ आदिवासी बोलीभाषेतील गाण्यावर नृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे ही दडपशाही असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा
या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने न्यायाच्या आणि समतेच्या तत्त्वांचे रक्षण करणे अपेक्षित आहे. जर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर आझाद समाज पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. या मागणीला जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून, या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
