अकोला : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ योजना जाहीर केली. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. त्यातच आता प्रशासनाने ही योजना नेमकी केव्हा लागू होणार, याचा कालावधी स्पष्ट केला आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून थेट कर्जखात्यांमध्ये रक्कम
महाकर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
एकवेळा समजोता आणि प्रोत्साहनपर लाभ
या योजनेत प्रामुख्याने तीन घटकांचा समावेश आहे. जे शेतकरी थकबाकीदार आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ म्हणजेच एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर, राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन
अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, म्हणून शासनाने त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीयोजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाने ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. .
संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या
सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जखात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.
.
