ज्योती तिरपुडे

प्रसाधनगृह, सुरक्षा आणि वाहनतळाचा अभाव

एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळतात म्हणून खरेदीसाठी महिला मॉल्समध्ये जाणे पसंत करतात. मात्र, प्रसाधनगृह, सुरक्षा आणि वाहनतळाचा अभाव त्यामुळे अशा मॉल्समध्ये गैरसोयींना त्यांना तोंड द्यावे लागते.

एकाच ठिकाणी किराणा, लहान आणि मोठय़ांचे कपडे, खाद्यपदार्थ आणि इतरही फॅन्सी वस्तू मिळत असल्याने मॉल्समध्ये जाण्यास महिला प्राधान्य देतात. मात्र प्रसाधनगृह, सुरक्षा आणि वाहनतळाची गैरसोय महिलांना सहन करावी लागते.

व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलमध्ये वाहनतळाच्या समस्येला महिलांना तोंड द्यावे लागते. तळघरात, बऱ्यापैकी उतार असलेल्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्यास महिला टाळतात. मॉलच्या समोर वाहन उभे करण्याची सोय त्या ठिकाणी नाही. शुक्रवारी तलावाजवळच्या एम्प्रेस मॉलमध्ये शनिवारी जुन्या वस्तूंचा बाजार भरत असल्याने वाहने ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी जागा नसते. त्यामुळे शनिवारी तेथे तुलनेने गर्दी कमी असते. त्यातुलनेत अलंकार सिनेमागृहासमोरच्या सेंट्रल मॉलमध्ये वाहनतळासाठी जागा असल्याने ग्राहक तेथे गर्दी करतात.

मॉल्सच्या समोर किंवा बाजूला तळमजल्यावर वाहनतळ असेल तर महिला जास्त पसंती देतात. भांडे प्लॉटजवळचे विशाल मार्ट किंवा पंचशील सिनेमागृहाजवळच्या बिग बाजारमध्ये वाहनतळाची सोय समोरच असल्याने महिला अशा ठिकाणी जाण्यास पसंती देतात.

वाहनतळाबरोबरच प्रसाधनगृहांचा मुद्दाही मॉल्समधील खरेदी-विक्रीवर परिणामकारक ठरतो. लांबच्या लांब भव्य मॉल्समध्ये एकटय़ा महिलेला प्रसाधनगृहांचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

ग्राहकांची पाठ

शहरातील मॉल्समध्ये फेरफटका मारला असता अनेक मॉल्समध्ये ग्राहकांचा अभाव दिसून आला. दुकानदार-कर्मचारी गप्पा मारत बसल्याचे एम्प्रेस मॉलमध्ये दिसून आले. एम्प्रेस मॉलचे चित्र यापेक्षा  वेगळे नव्हते.

ठळक मुद्दे

*   शॉपिंग मॉल्समध्ये जाणाऱ्या ६७ टक्के ग्राहक या महिला असतात

*   मॉल्समधून खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार महिलांचा वाटा ४१ टक्के आहे.

*   २५ ते ५४ वयोगटातील महिला सर्वाधिक खरेदी करतात.

गर्दी किंवा मानवी हालचाल असेल तर सुरक्षित वाटते. मात्र, कधीकधी वाहनतळ, सुरक्षा किंवा प्रसाधनगृहे असूनही मॉल्सचा अवाढव्यपणाही एकटय़ा महिलेला भीतिदायक वाटतो. एम्प्रेस मॉल किंवा इटर्निटीमध्ये तळघरात महिलांनी वाहन घेऊन जाणे फारच अवघड आहे. रात्री थोडासा उशीर झाल्यास एकटी महिला त्याठिकाणी वाहन

घेऊन जाऊच शकत नाही. शिवाय काही विशिष्ट सुविधा किंवा गरजांसाठी मॉल्समध्ये विक्री करणाऱ्या महिला असल्यास खरेदी करणाऱ्या महिलांच्या सोयीचे असते.

अशाही वेळी त्या सुरक्षित जाणवते. अगदी प्रसाधनगृह, सॅनिटरी नॅपकीन किंवा कॉमन रूमविषयी महिला महिलेला विचारणे पसंत करते. म्हणून ज्या मॉल्समध्ये महिलांचा वावर जास्त असतो, अशा ठिकाणची विक्रीही चांगली होते.

– पल्लवी कुलकर्णी, सॉफ्टवेअर मॅनेजमेंट