Water and Farming Problems Western Vidarbha: पश्चिम विदर्भात पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाणपट्ट्याची जमीन हा व्यापक संशोधनाचा विषय ठरला. खारपाणपट्टा निसर्गनिर्मित मोठी समस्या आहे. भूजल हे पूर्णतः खारे. क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने शेतीचा पोतही खराब झाला. यावर विविध संशोधने झाली आहेत. कोट्यवधींचा खर्च झाला. खारपाणपट्ट्याची समस्या सुटेल, अशी उपाययोजना मात्र अद्याप गवसलेली नाही. ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. खारे पाणी तसेच माती क्षारयुक्त असल्याने कृषी क्षेत्रालाही अनेक समस्यांनी ग्रासले. खारपाणपट्ट्याची नैसर्गिक समस्या आणि वास्तव खऱ्या अर्थाने जाणून घेत त्यावर प्रभावी उपाययोजनेची गरज दिसून येते.

चार लाख ७० हजार हेक्टरवर क्षेत्र

पूर्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खारपाणपट्टा अस्तित्वात आहे. खारपाणपट्ट्यामध्ये पश्चिम विदर्भातील १६ तालुक्यांतील चार लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र येते. पूर्णा नदीकाठच्या दोन्ही काठांवरील भागात भूगर्भातील पाणी अत्यंत खारे आहे. सुमारे ४० ते ५० कि.मी. रुंद आणि १५५ कि.मी. लांबीच्या भागाला खारपाणपट्टा म्हटले जाते. पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने सात हजार ५०० चौरस कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे. यात ४,७०० चौरस कि.मी. म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र खारपाणपट्ट्यात मोडते. तीन जिल्ह्यांतील ८९४ गावे खारपाणपट्ट्याने बाधित झाली.

क्षार मिसळून पाणी खारट; दुहेरी संकटांचा सामना

भूगर्भात खारे पाणी तसेच माती क्षारयुक्त असल्याने भूपृष्ठावर संचयित केलेल्या पाण्यात क्षार मिसळून पाणी खारट होते. गोड्या पाण्याची समस्या कायमच भेडसावते. मातीसोबतच पाणीसुद्धा खारे असल्याने भूगर्भातील पाणी सिंचन तसेच पिण्यासाठी अयोग्य आहे. या जमिनीत मातीच्या कणांवर चिकटलेल्या क्षाराचे (सोडियम) सरासरी शेकडा प्रमाण ३.९७ ते १५.३५ दरम्यान आहे. सिंचनाच्या सोयीसुद्धा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. नागरिकांना कृषी व पिण्याचे पाणी अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागतो.

जमिनीवर साचतात मिठाचे थर

खारपाणपट्ट्यातील काळ्या जमिनीत क्षार व खार असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. भाग सखल असल्याने पाणी वाहूनसुद्धा जात नाही. ते क्षार व खार जमिनीच्या पृष्ठभागावर साचू लागतात. जमिनीची धूप झाल्याने व पावसाचे पाणी वाहून गेल्याने प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे जमिनीच्या आतील क्षार पृष्ठभागावर येतात व जमिनीवर मिठाचे थर साचायला सुरुवात होते. खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आहेत. त्यांचे पाणी खारे आहे. गोड्या पाण्याचे दुसरे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पिण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा लागतो.

पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड हालअपेष्टा

पाण्यासाठी पूर्णा व तिच्या उपनद्यांवर ग्रामस्थ अवलंबून आहेत. पावसाळा झाल्यावर नद्या कोरड्या पडतात. त्यांच्या पात्रात खोदलेल्या खड्ड्यांभोवती हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतानाचे विदारक चित्र खारपाणपट्ट्यात सर्वत्र दिसून येते. काही पाणीपुरवठा योजना या शेवटच्या गावापर्यंत पाणी पुरवण्यास सक्षम ठरत नाहीत. उन्हाळ्यात खारपाणपट्ट्यातील पाण्याची स्थिती दरवर्षी बिकट होत असते. विविध पाणीपुरवठा योजना फारशा उपयुक्त ठरल्या नाहीत. अनेक योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हे जळजळीत वास्तव कायम आहे.

कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम

पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाणपट्ट्याचा शाप शेती, मातीलाही बसला. जमीन व पाणी खारे असल्याने भूगर्भातील पाणी सिंचनाच्या उपयोगाचे ठरत नाही. पर्यायाने भूपृष्ठावरील साठ्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. संपूर्णतः निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून कोरडवाहू शेती आहे. खारपाणपट्ट्यात शेती करणे कमालीचे अडचणीचे ठरते. पावसाळ्यात दलदलीप्रमाणे फुगलेली शेती, तर उन्हाळ्यात भेगाळलेल्या जमिनी हे चित्र असते. संपूर्ण कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. पाऊस कमी किंवा जास्त झाला तरी लगेच पिके धोक्यात येतात.

मूत्रपिंडाच्या आजारासह विविध व्याधींनी ग्रासले

वर्षानुवर्षे गढूळ व क्षारयुक्त पाणी पिल्याने खारपाणपट्ट्यातील गावांमधील नागरिकांना मूत्रपिंडाच्या आजारासह विविध व्याधींनी ग्रासले. दरवर्षी शेकडो रुग्णांचा बळी जातो. बहुतांश घरांमध्ये मूत्रपिंडाचे रुग्ण आढळून येतात. खाऱ्या पाण्यामुळे पोटाचे व इतर आजारदेखील बळावतात. उपचारासाठी शहराच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने शारीरिक व आर्थिक संकटामुळे खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. खारपाणपट्ट्याच्या प्रश्नावर उपाययोजनेसाठी असंख्य संशोधने झाली. मात्र, त्यांचा मूळ उद्देशच भरकटला. खारपाणपट्ट्यात ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी संशोधन केवळ कागदावरच न राहता ते जमिनीवर उतरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.