लोकसत्ता टीम

नागपूर : गडचिरोलीतील नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार (८०) यांचा खून करण्याचा कट रचला होता. तसेच पुरुषोत्तम यांच्या हत्येचा दोनदा प्रयत्न करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे या हत्याकांडातील सत्यता बाहेर काढण्यासाठी अर्चना हिला पोलीस पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार (८२, शुभनगर, मानेवाडा) यांचा २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ.मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.

आणखी वाचा-नागपूर : पब्जीच्या नाद भोवला, वाढदिवशी विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रशांत आणि त्याची बहिण अर्चना पुट्टेवार यांना योगिताला संपत्तीतील वाटा द्यायचा नव्हता. मात्र, योगिताची न्यायालयीन लढाई सासरे पुरुषोत्तम लढत होते. त्यामुळे त्यांच्या हत्याकांडाचा कट सहा महिन्यांपूर्वीच वडस्यातील एका धान घोटाळा करणाऱ्या आरोपीच्या घरी रचला होता. कटानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यावर आतापर्यंत दोनदा अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही घटनेतून पुरुषोत्तम बालंबाल बचावले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा अपघाताचा बनाव करून पुरुषोत्तम यांचा खून करण्यात आला. या सर्व बाबींमध्ये अस्पष्टता असल्यामुळेच सध्या कारागृहात असलेल्या अर्चना पुट्टेवार हिला पोलीस पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

तीन दिवस पोलीस कोठडी

प्रशांत पार्लेवार, अर्चनाची सहकारी आर्किटेक्ट पायल नागेश्वर, आरोपी नीरज निमजे, सचिन धार्मिक, सार्थक बागडे यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या हत्याकांडात आणखी काही आरोपींचा समावेश असून पोलीस त्यांचा शोध आहे. या हत्याकांडात पार्लेवार-पुट्टेवार कुटुंबियांतील कुण्या सदस्यांचा हात आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी वाचा-बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार? आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा; म्हणाले…

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय

पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा २२ मेला कारने चिरडून खून करून अपघाताचा देखावा करण्यात आला. मात्र, अजनीचे ठाणेदार गजानन तामटे यांच्या आदेशाने पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल दाखल करून तपास थंडबस्त्यात ठेवण्यात आला. जर पुट्टेवार यांच्या एका नातेवाईकाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन माहिती दिली नसती तर आज अपघात म्हणून हे प्रकरण न्यायालयात पाठविण्यात आले असते. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश ताले हे तपासात पारदर्शकता न ठेवता प्रसारमाध्यमांना अर्धवट माहिती देत आहेत. त्यामुळे त्यांच्त्ही कार्यप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे. ताले यांच्यावर कुण्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव असल्याची चर्चा आहे.

हत्याकांड घडवून काय साध्य झाले?

अर्चना पुट्टेवार ही वर्ग एकची शासकीय अधिकारी असून तिने गडचिरोलीत २०० कोटींचा जमीन घोटाळ्यात कोट्यवधी रुपये कमावले. ‘एमएसएमई’चा संचालक प्रशांत पार्लेवार हासुद्धा वर्ग एकचा शासकीय अधिकारी असून त्यानेसुद्धा कोट्यवधीची माया गोळा केली आहे. अर्चना आणि प्रशांत यांच्याकडे वडिलोपार्जित कोट्यवधीची संपत्ती आहे. सध्या दोघेही कोट्यधीस असलेले बहिण-भाऊ कारागृहाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अर्चना आणि प्रशांतला या हत्याकांडातून काय साध्य झाले? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.