यवतमाळ : विस्तीर्ण ईसापूर धरण समोर असूनही केवळ नियोजनाअभावी पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४० गावांना पाण्यासाठी वर्षानुवर्षे वणवण करावी लागत आहे. पुसद तालुक्यात नाईक कुटुंबीय सातत्याने सत्तेत राहुनही हा प्रश्न अद्याप न सुटल्याने दरवर्षी उन्हाळ्यात माळपठार भागातील पाणीटंचाई प्रश्न तीव्र होतो. मात्र आता नाईक कुटुंबियातच या गंभीर प्रश्नावरून दोन गट पडले आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय सरसावले

माळपठार भागातील ४० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी यासाटी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कुटुंबीय पुढे आले आहे आहे. मीना निरंजन नाईक आणि निहारिका निरंजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. माळपठाराला लिफ्ट इरिगेशनद्वारे हक्काचे पाणी द्यावे आणि यवतमाळ जिल्ह्याचा पीक विम्यात समावेश करावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. हे प्रश्न सुटले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पुसद तालुक्यातील दुर्गम माळपठार भागातील हजारो शेतकर्‍यांचे जीवन शेती आणि पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, ईसापूर धरण उशाला असूनही तांत्रिक अडचणी आणि प्रकल्पांच्या अभावामुळे या भागाला कायमच कोरड सोसावी लागली आहे. कोसो दूर भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने हताश झालेले ग्रामस्थ आता स्थलांतर करू लागले आहेत. ही भयावह स्थिती बदलण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव निरंजन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीना आणि निहारिका नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी मोठ्या संख्येने शेतकरी आणि तरुणांना सोबत घेऊन प्रशासनाला जाब विचारला.

’लिफ्ट इरिगेशन’ चा पर्याय

माळपठारावरील ४० गावांची तहान भागवण्यासाठी ईसापूर धरणातून ’लिफ्ट इरिगेशन’ योजनेला तातडीने शासन स्तरावरून मंजुरी मिळणे अनिवार्य आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकल्पाचा ठोस प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून त्याचा युद्धपातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. सिंचनाची सोय झाल्यास शेतकर्‍यांचे होणारे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरही रोखता येईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला. पाणी प्रश्‍नासोबतच यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळल्याबद्दल यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीचा सातत्याने फटका बसणार्‍या यवतमाळच्या शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता, जिल्ह्याचा समावेश पुन्हा पीक विम्यात करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात माळपठारवासीय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा नाईक कुटुंबीयांनी दिला आहे.