यवतमाळ : पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. एकाच शेतमालाच्या दोन वेगवेगळ्या वजनांमध्ये तब्बल ९ क्विंटल ६५ किलोची तफावत आढळल्याने बाजार समिती आवारात एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या कष्टावर काटामारी करून दरोडा टाकणाऱ्या दोषींवर निष्पक्ष चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

पुसद तालुक्यातील आमटी येथील शेतकरी देवराव अप्पाराव व्हलगिर यांनी आपला गहू विक्रीसाठी पुसद बाजार समितीत आणला होता. गव्हाचा लिलाव झाल्यानंतर गाडी वजन काट्यावर लावण्यात आली. पहिल्यांदा करण्यात आलेल्या वजनात गव्हाचे एकूण वजन ४२ क्विंटल ३५ किलो भरले. मात्र, आपला गहू वजनाने यापेक्षा जास्त असल्याची खात्री संबंधित शेतकऱ्याला होती. मनात शंका आल्यामुळे शेतकऱ्याने अर्ध्या तासानंतर तीच गाडी पुन्हा वजन काट्यावर चढवली. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्यांदा याच गव्हाचे वजन ५२ क्विंटल १० किलो भरले. एकाच गाडीच्या वजनात अवघ्या काही मिनिटांत झालेली ही ९ क्विंटल ६५ किलोची विसंगत तफावत पाहून शेतकरी चक्रावून गेला.

शेतकऱ्यांचा संताप, रस्ता रोको

हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच बाजार आवारातील इतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत वजन काट्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर आक्षेप नोंदवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नागपूर-पुसद महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना शेतकरी नेते मनीष जाधव यांनी बाजार समितीवर अत्यंत गंभीर आरोप केले. कधी हमाली आणि मापारीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली केली जाते, तर कधी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न झाल्याने काम बंद आंदोलन केले जाते. या सर्व भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका आणि नाहक त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. ही बाजार समिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी कत्तलखाना ठरत आहे, असा आरोप जाधव यांनी केला. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले.

खासदारांकडून दखल, वजन काटा ‘सील’

बाजार समितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता पुसद शहरचे ठाणेदार सदानंद वानखेडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी फोनवरून ठाणेदार वानखेडे यांच्याशी चर्चा केली आणि दोषींवर तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. पीडित शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात बयान नोंदवण्यासाठी नेण्यात आले, तर पोलीस प्रशासनाने तात्काळ बाजार समितीतील वजन काटा कार्यालयाला सील ठोकले. या आंदोलनाप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रेमराव सरगर, शेतकरी संघर्ष समितीचे सचिव विकास राठोड, आदित्य जाधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.