नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत असलेले रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग वाहतूक सुलभ करण्याऐवजी अडचणी वाढवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नियोजनाचा अभाव, चुकीचे आरेखन आणि सदोष बांधकाम यामुळे कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला कावरापेठ ते जुना कामठी रोड रेल्वे उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे.

शहरातून देशाच्या चारही दिशांना महत्त्वाचे रेल्वे मार्ग जातात. त्यामुळे शहरात विविध यंत्रणांकडून रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची कामे सुरू आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मेट्रो आणि महारेल यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. शांतीनगर ते राजीव गांधीनगर आणि कावरापेठ ते जुना कामठी रोड या दोन रेल्वे उड्डाणपुलांचे आरेखन चुकीचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चुकीच्या रचनेमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला एक उड्डाणपूल बंद ठेवावा लागत आहे. तर उड्डाणपुलाच्या काही भागातून अपुऱ्या उपाययोजनांवर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

कावरापेठ ते जुना कामठी रोड रेल्वे उड्डाणपूल कळमना मार्गावरून सुरू होऊन दोन रेल्वे मार्ग ओलांडतो आणि पुढे तीन दिशांना विभागला जातो. हा पूल शांतीनगर-राजीव गांधीनगर आणि कावरापेठ येथील विद्यमान उड्डाणपुलांना जोडण्यात आला आहे. मात्र, या पुलाला स्वतंत्र उतार (लँडिंग) नसल्याने तो वाहतुकीसाठी सुरू करता आला नाही. परिणामी, जुना कामठी रोडकडून येणारी वाहतूक शांतीनगर ते राजीव गांधीनगर उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दररोज अपघात होणे नित्याची बाब झाली आहे.

शांतीनगर घाटाकडून जुनी कामठीकडे जाणारी वाहने आणि राजीव गांधीनगरकडून येणारी वाहने एकाच ठिकाणी येत असल्याने येथे ‘टी-पॉइंट’ तयार झाला आहे. अपुऱ्या रुंदीचा रस्ता, दुभाजकामुळे निर्माण झालेली अडचण आणि यू-टर्नची कोणतीही व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

कावरापेठ ते जुना कामठी मार्गावर तीन रेल्वे मार्ग असल्याने पूर्वी रेल्वे फाटकांवर वाहनांना तासनतास थांबावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा गुंतागुंतीचा रेल्वे उड्डाणपूल उभारला. या प्रकल्पासाठी १८० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, तर प्रत्यक्ष खर्च १४१.६२ कोटी रुपये झाला आहे.

कळमना-राजीवनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. काम सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाले. मात्र, चुकीच्या आरेखनामुळे हा उड्डाणपूल उद्देशपूर्ती करण्यात अपयशी ठरत असून, नागपूरकरांच्या वाहतुकीच्या समस्येत भरच पडली आहे. यापूर्वी सदर उड्डाणपुलामुळे संविधान चौक ते इंदोरा चौकाला जोडणारा रस्ता बंद करावा लागला होता. याशिवाय मानकापूर रेल्वे भुयारी मार्ग, वर्धमानगर येथील भुयारी मार्गात पावसाचे पाणी शिरून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना समोर आल्या आहे. तर सदोष बांधकाम झाल्याचे मानकापूर, मंगळवारी रेल्वे उड्डाणपुलाचेही प्रकरण समोर आहे.

शहरातील काही उड्डाणपूल अनियोजित विकासाचा नमुना आहे. सरकारकडे तज्ज्ञ अभियंते, सल्लागार असताना चुकीच्या ‘डिझाईन’ला मंजुरी कशी मिळाली आणि हा उड्डाणपूल कसा काय बांधण्यात आला याची चौकशी झाली पाहिजे. तसेच संबंधितांकडून दंड वसूल करून नव्याने उड्डाणपूल उभारले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार)शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केली.