नागपूर : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे झिया खान यांनी बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात एकूण २५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. प्रत्येक प्रतिवादीकडून ५० कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. या दाव्याची दखल घेत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. डी. कराडभाजने यांनी पाचही प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. दरम्यान, खान यांना आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विहिंप आणि बजरंग दलाने नागपुरात आंदोलन केले होते. या वेळी खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते.
आंदोलनातील आरोपांवरून मानहानीचा दावा
या दाव्याची पार्श्वभूमी २८ सप्टेंबर २०२४ रोजी महालमधील बडकस चौकात झालेल्या आंदोलनाशी संबंधित आहे. त्या वेळी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खान यांच्याविरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली होती. कुख्यात गुंड अबू सालेम याच्याशी खान यांनी संशयास्पद भेट घेतल्याचा तसेच देशविरोधी कारवायांना समर्थन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप खोटे, निराधार आणि हेतुपुरस्सर बदनामी करणारे असल्याचा दावा खान यांनी न्यायालयात केला आहे.
पाच प्रतिवादींकडून प्रत्येकी ५० कोटींची मागणी
या दाव्यात अमोल ठाकरे, विलास पाटील, शुभम आर्खेल, गजेंद्र ऊर्फ टीकू विज आणि लखन कुरिल यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रत्येकाकडून ५० कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिवादींना मनाई करावी, समाजमाध्यमांवरील संबंधित रील्स, व्हिडीओ आणि पोस्ट हटविण्याचे आदेश द्यावेत तसेच जाहीर माफी मागण्यास सांगावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. खान यांच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे, अॅड. गौरांग भाके आणि अॅड. चेतन डोंगरे यांनी बाजू मांडली.
अबू सालेमच्या भेटीवरून वाद
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या पाहणीदरम्यान ८ सप्टेंबर रोजी प्यारे खान आणि अबू सालेम यांची भेट झाली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या सालेमने शिक्षेचा २५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याचा दावा करून सुटकेची मागणी केली होती. या भेटीवरून विहिंपने खान यांच्यावर टीका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, ही भेट अल्पसंख्याक आयोगाच्या अधिकृत पाहणीचा भाग असल्याचे स्पष्टीकरण खान यांनी दिले होते.
गडकरींच्या भेटीनंतर आंदोलनाचे ठिकाण बदलले
खान यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विहिंप आणि बजरंग दलाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल परिसरातील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र, आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांची भेट घेतली. संबंधित विभागांकडे तक्रारी पाठवून त्यांची तपासणी केली जाईल, असे आश्वासन मिळाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर निवासस्थानासमोरील आंदोलनाचे ठिकाण बदलून महालमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी खान यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते.
