नागपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे झिया खान यांनी विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) पाच कार्यकर्त्यांविरोधात २५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नागपुरात आले असता विहिंपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. देवगिरी येथे झालेल्या या बैठकीत प्यारे खान यांच्याशी संबंधित वादाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्याची माहिती आहे.

नेमके प्रकरण काय?

प्यारे खान यांनी कुख्यात गुंड अबू सालेम याची नाशिकच्या कारागृहात भेट घेतल्याचा आरोप सप्टेंबर महिन्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला होता. महालमधील बडकस चौकात झालेल्या आंदोलनादरम्यान फलक आणि घोषणांच्या माध्यमातून खान यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच, त्यांच्यावर देशविरोधी कारवायांना पाठिंबा दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.

२५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

या आरोपांमुळे आपली प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा करत प्यारे खान यांनी पाच जणांविरोधात प्रत्येकी ५० कोटी रुपयांप्रमाणे एकूण २५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. डी. कराडभजणे यांनी या प्रकरणी पाचही प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. संबंधित समाजमाध्यमांवरील पोस्ट, रील्स आणि व्हिडीओ हटवण्यासह जाहीर माफी मागण्याचे निर्देश देण्याची मागणीही खान यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर विहिंपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते. मात्र, या चर्चेत नेमकी कोणती भूमिका मांडण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यावर काय प्रतिसाद देण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्यारे खान यांच्या नियुक्तीवरून वाद

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेम याची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विहिंप आणि बजरंग दलाने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. प्यारे खान यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमागे गडकरी यांची भूमिका असल्याचे मानले जात असल्याने या वादाचे राजकीय पडसाद उमटल्याची चर्चा आहे. प्यारे खान हे गडकरी यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी गडकरी यांच्यावर दबाव आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली का, असा तर्क व्यक्त केला जात आहे.