कचरा संकलन अधिक पारदर्शक होणार

नागपूर :  ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आता घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार आहे. राज्यात प्रथमच शहरात ही यंत्रणा वापरण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल.

नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महापालिकेच्या वतीने शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत नागरिकांच्या घरांवर असे क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. महापालिकेकडे सतत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी  प्रायोगिक तत्त्वावर रविनगर, अमरावती रोड येथील मरारटोली आणि पीअ‍ॅण्ड टी कॉलनीतील दहा घरांमध्ये हे क्यूआर कोड  गुरुवारी लावण्यात आले. कचरा संकलन करणारा कर्मचारी या कोडवर आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी सकाळी धरमपेठ झोनतंर्गत काही नागरिकांशी संवाद साधला आणि याबद्दल माहिती प्राप्त करून घेतली. बग्स फ्री सोल्युशन कंपनीतर्फे दहा घरात प्रयोगिक तत्त्वावर क्यूआर कोड  लावण्यात आले. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना महापौर म्हणाले, स्वच्छतादूत वेळेवर येत नाही, अशी नगरसेवक आणि नागरिकांची तक्रार होती. त्यांच्या वेळासुद्धा निश्चित नसतात. आता स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट सिटी व महापालिका यांच्या सहकार्याने तक्रारींचे निराकरण

करणे शक्य होणार आहे. कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत ज्या घरातील कचरा घेतील त्याचा घर क्रमांक, घरमालकाचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. एका झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण शहरात लागू करण्याचा विचार करू. या माध्यमातून नागरिकांची कचऱ्याची समस्या सोडवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

सफाई कर्मचाऱ्यांवर मात्र नियंत्रण नाही

क्यूआर कोडच्या माध्यमातून कचऱ्याची उचल करण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी शहरातील विविध झोनमध्ये काम करणाऱ्या कामचुकार सफाई कर्मचाऱ्यावर कसे नियंत्रण आणणार, हा प्रश्न कायम आहे. शहरातील विविध झोनमध्ये सफाई कर्मचारी हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करतात मात्र प्रभागात कामाला कुठेच दिसत नाही. त्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही. गांधीबाग झोनतंर्गत अनेक स्थायी सफाई कर्मचारी तर काम न करताच प्रभागातील वेगवेगळ्या भागात किंवा चौकात बसून राहतात आणि त्यांच्या नावावर गोरगरीब महिला काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.