अकोला : अजित पवारांच्या विमान अपघातात सुरुवातीला सहा सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मग पाचच मृतदेह कसे आढळले? असा गंभीर प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले. अमोल मिटकरींनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करीत खळबळ उडवून दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट टाकून विविध प्रश्न उपस्थित केले.

अमोल मिटकरी म्हणाले, “अजितदादा गेले हे अद्यापही मन मानायला तयार नाही. त्यांच्या मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी तरी करणार नाही. मात्र, हे प्रश्न माझे मन विचारत आहेत.” अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा गंभीर प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

एखादाही कागदाचा तुकडा का जळला नाही?

प्रवासी यादी नोंदलेली असते, मग विसंगती का?एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असेही प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.

जाणीवपूर्वक अफवा

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अफवा पसरवणं हे राजकीय हेतूने केलं जात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनी अशा वृत्तांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे. राज्यासह संपूर्ण देशात गाजत असलेले अजित पवार यांचे विमान अपघात प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.