गडचिरोली : बंदी असतानाही गडचिरोली जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा सर्रास वापर नवीन नाही. मधल्या काळात पोलिसांनी याविरोधात कारवाई केली. लाखोंचा अवैध माल जप्त करीत तस्करांच्या मुसक्या आवळल्या. परंतु पकडण्यात आलेले आरोपी हे केवळ लहान तस्कर असून एटापल्ली आणि आरमोरी येथील मुख्य ‘माफिया’ अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कारवाईनंतरही दररोज छत्तीसगडवरून तांबखू तस्करी सर्रास सुरू आहे.
गेल्या महिनाभरात दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, आष्टी पोलीस हद्दीत कारवाई करीत पोलिसांनी तंबाखू तस्करांना अटक केली. यात लाखोंचा माल देखील जप्त केला. मात्र, या भागात तंबाखू तस्करी सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केल्या जात आहे. छत्तीसगड आणि तेलंगणातून हा तंबाखू महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणला जातो. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू तस्करीतून वर्षाकाठी २०० कोटींहून अधिकची उलाढाल होत असते, असे या व्यवसायात असलेले सांगतात.
प्रामुख्याने सीमाभागातून तस्करीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मधल्या काळात कारवाई देखील वाढल्या. परंतु यात केवळ लहान तस्कर जाळ्यात अडकले मोठे मोकाट आहेत. जिल्ह्यातील एटापल्ली आणि आरमोरी या दोन शहरातून हे ‘रॅकेट’ चालते. यातून दोन ‘तंबाखू माफिया’ जन्माला आले आहे. दररोज लाखात होणारी कमाई हे यामागचे मुख्य कारण आहे. बेरोजगार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना हाताशी घेत या दोघांनी तंबाखू तस्करीत आपले प्रस्त वाढवले. राजकीय लोकांशी जवळीक वाढवून हे माफिया अनेकदा कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असतात. हे विशेष.
छत्तीसगड सीमेवर कारखाना सर्वाधिक तंबाखूची खेप
छत्तीसगड वरून महाराष्ट्रात आणल्या जाते. तंबाखूच्या दर्जानुसार त्याचे वर्गीकरण करून ते वेगवेगळ्या डब्ब्यात बंद करून नंतर जिल्ह्यातील विविध भागात त्याची तस्करी केल्या जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी गडचिरोली छत्तीसगड सीमेवर चक्क कारखाना सुरु करण्यात आला आहे. तो मागील काही वर्षपासून कार्यरत आहे. येथूनच मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. परंतु पोलिसांनी आत्तापर्यंत कारवाई करताना केवळ लहान तस्करांना जेरबंद केल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी आलापल्ली कारवाई करण्यात आली होती. त्यातील आरोपी फरार दाखवला होता. परंतु कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी शहरातील लग्नात अनेकांनी त्याला पाहिले. तंबाखू तस्करीच्या मार्गावरील प्रत्येक पोलीस ठाण्यात लाखोंचा हप्ता जात असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच मुख्य ‘माफिया’ आजपर्यंत मोकाट असल्याचीही चर्चा आहे.