नागपूर : महापालिका निवडणुकीत भाजपचे १०२ नगरसेवक निवडून आले. यात बहुतांश प्रभागांमधील किमान दोन नगरसेवकांना मिळालेल्या मतांमध्ये किंचित अंतर असल्याने, हा योगायोग कसा, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांच्या तपशीलातून एकाच प्रभागातील दोघांमध्ये २२ ते ४०० मतांचा फरक आहे तर त्याचवेळी काँग्रेसच्या एकाच प्रभागातील नगरसेवकांना मिळालेल्या मतांचे अंतर २ ते ७ हजार आहे.
निवडणुकीत भाजपला ५ लाख ३२ हजार तर काँग्रेसला ४ लाख १९ हजार मते मिळाली. उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांच्या तपशीलातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांमध्ये दोन नगरसेवकांना मिळालेल्या मतांमध्ये फारच कमी फरक आहे. प्रभाग १६ मध्ये भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले. परंतु, येथे ‘अ’ प्रवर्गातील लखन येरावार यांना १९,५११ तर ‘ड’ प्रवर्गातील सुनील दांडेकर यांना १९,५६२ मते आहे. या दोघांतील मतांचे अंतर केवळ केवळ ५१ आहे. असा फरक एकाच प्रभागात नव्हे तर अनेक प्रभागांमध्ये दिसून येत आहे.
प्रभाग ३६ मध्ये ‘अ’ प्रवर्गातील अमोल श्यामकुळे यांना २०,७४७ मते आहेत तर ड प्रवर्गातील ईश्वर ढेंगळे यांना २०,६०५ मते आहे. या दोघांतील मतांचा फरक १४२ आहे. प्रभाग ३७ मध्ये ‘क’ गटातील अश्विनी जिचकार व प्रा. दिलीप दिवे यांच्या मतांचा फरक २५४ आहे. प्रभाग १३ मध्ये ‘अ’ गटातील योगेश पाचपोर व ‘क’ गटातील वर्षा चौधरी यांच्या मतांचा फरक ४५ आहे. प्रभाग १४ मध्ये ‘ब’ गटातील माधुरी टेकाम व ‘क’ गटातील विनोद कन्हेरे २९० मतांचा तर प्रभाग १५ मध्ये ‘अ’ गटातील पूजा पाठक यांना १८,२९५ तर क गटातील धनश्री देशपांडे यांना १८२६४ मते मिळाली. या दोघांमध्ये केवळ ३१ मतांचे अंतर आहे. प्रभाग ३४ मध्ये अ गटातील नागेश मानकर व क गटातील मंगला खेकरे यांच्यात ८१ मतांचे अंतर आहे. प्रभाग ३२, ३१, २९, ३५, २६, २७, २०, ४, १ येथेही हीच स्थिती आहे.
विशेष म्हणजे हा योगायोग काँग्रेसच्या एकाच प्रभागातील नगरसेवकांत दिसून येत नाही. प्रभाग ८, प्रभाग २, प्रभाग ९, प्रभाग ७ मध्ये काँग्रेसचे चार किंवा दोनपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. प्रभाग ८ मधील काँग्रेसचे अ प्रवर्गातील सय्यद मुस्कान यांना २७,७५१, ब प्रवर्गातील सिराज अहमद यांना २०,८६८, सय्यदा बेगम यांना १६,६३०, वसिम खान यांना २०,०९८ मते आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या तुलनेत घेतलेल्या मतांमध्ये २ ते ७ हजारांचा फरक आहे. त्यामुळे किंचित मतांचा हा योगायोग केवळ एका प्रभागातील भाजपच्या दोनच नगरसेवकांबाबत दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पराभूत उमेदवारांतही सारखीच स्थिती केवळ नगरसेवकांबाबतच नव्हे तर पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांबाबतही सारखीच स्थिती आहे. प्रभाग ६ मध्ये भाजप चौथ्या स्थानावर असून येथे मुस्लीम लीगचे चारही नगरसेवक निवडून आले. भाजपच्या अ, ब, क, ड गटातील पराभूत उमेदवारांना येथे अनुक्रमे ५,७६१, ६४३१, ५,५१३, ५,४५३ अशी मते आहेत. याशिवाय प्रभाग ३३ मध्ये विशाखा बांते या पराभूत उमेदवारास १४,५२३ तर अ गटातील विजयी अंकित चौधरी यांना १४,४६८ मते आहे.

