भरोसा सेलच्या कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न; मूकबधिर दाम्पत्याचे विस्कटू पाहणारे बंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

अनिल कांबळे

नागपूर : ‘ते’ दोघही मूकबधिर.. त्याची देवावर अगाढ श्रद्धा, तर ती चक्क नास्तिक.. तरीही या विजोड जोडप्याला एका मध्यस्थाने लग्नासाठी एकत्र आणले.. आप्तेष्टांच्या साक्षीने शुभमंगलही झाले.. पण, लग्नानंतर दोघांच्या मध्ये  ‘देव’ उभा ठाकला.. त्याचे अखंड पूजापाठ तिला खटकायला लागले.. खटके उडायला लागले.. अखेर दोघेही सांकेतिक हातवारे करीत एकमेकांशी भांडत थेट भरोसा सेलमध्ये पोहोचले. पण, त्यांची सांकेतिक भाषा पोलिसांना कळेचना.. अखेर मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य मदतीला धावले आणि त्यांच्या भांडणाचे कारण गवसले.. आता भरोसा सेलचे कर्मचारी त्यांचे विस्कटू पाहणारे बंध पुन्हा जोडू पाहताहेत..

सुशांत आणि रिया (बदललेले नाव) हे दोघेही मूकबधिर. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात त्यांचा विवाह झाला. सुशांत हा एका कंपनीत शीतपेयाच्या बाटल्या पोहचवण्याचे काम करतो. त्याला जवळपास १२ हजार रुपये वेतन आहे.  रिया गृहिणी आहे. दोघांचेही शिक्षण मूकबधिर विद्यालयातून बारावीपर्यंत झाले. एका नातेवाईकाच्या मध्यस्थीने दोघांचेही थाटात लग्न झाले. लग्नानंतर दोघांचाही महिनाभर संसार नीट सुरू होता. सुशांत हा प्रचंड धार्मिक तर रिया ही नास्तिक. त्यामुळे धार्मिक पूजा किंवा नियम पाळण्यावरून दोघांत वाद व्हायला लागले.  दोघेही सांकेतिक भाषेत भांडत होते. वाद इतका टोकाला गेला की लग्न मोडण्यापर्यंत विषय गेला. मात्र, दोघांच्याही नातेवाईकांनी मध्यस्थी करीत भरोसा सेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोघेही सोमवारी सकाळी भरोसा सेलमध्ये आले.  पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे आणि सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वला मडावी यांनी दोघांनाही समस्या विचारली. दोघांनाही बोलता आणि ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सांकेतिक भाषेत पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांकेतिक भाषा व हातवारे कळत नसल्यामुळे दोन्ही महिला अधिकारी हतबल झाल्या.

तासभर दोन्ही अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि अखेर मूकबधिर शाळेतील शिक्षक अजित नगरखणे यांना भरोसा सेलमध्ये बोलावून घेतले. मूकबधिर दाम्पत्य शिक्षकांशी सांकेतिक भाषेत बोलायला लागले. दाम्पत्य काय म्हणतात, हे पोलिसांना सांगायला लागले. तासाभरात दोघांचीही समस्या  लक्षात घेतली. आता त्यांच्या संसारात आलेला अडथळा दूर करण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी सीमा सूर्वे, उज्ज्वला मडावी आणि समुपदेशक प्रेमलता पाटील प्रयत्न करीत आहेत. 

नवविवाहित मूकबधिर दाम्पत्य तक्रार मांडायला भरोसा सेलमध्ये आले. आम्ही समुपदेशक आणि दोन शिक्षकांच्या मदतीने त्यांची तक्रार ऐकून घेतली. दोघांच्याही मनातील समज-गैरसमज दूर करून त्यांच्या संसाराची घडी नीट बसवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

– सीमा सुर्वे (पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)