अकोला : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात ८० च्या दशकात राघू मैना चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे नानांनी राघू मैना चित्रपटात अजरामर भूमिका साकारून छाप सोडली. या चित्रपटाचे चित्रीकरण अकोला शहर व परिसरात झाल्याने नाना पाटेकर यांचा अनेकांना सहवास लाभला.
आज त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना नानांच्या आठवणीने गहिवरून आले. या दुःखद घटनेवर बोलूही शकत नसल्याची भावना ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. नानांच्या अचानक जाण्याने कला, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला.
‘राघू मैना’मध्ये नानांच्या कसदार अभिनयाची छाप
‘राघू मैना’ या चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाची छाप नाना पाटेकर यांनी सोडली होती. १९८२-१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि अत्यंत गाजलेल्या या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते. या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीत आजही एक महत्त्वाचे स्थान आहे. मुख्य कलाकार म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मधू कांबीकर, निळू फुले, अशोक सराफ, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी भूमिका बजावली. या चित्रपटाची निर्मिती माजी प्राचार्य डॅडी देशमुख यांनी केली होती. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अकोला आणि पातूर परिसरात झाले. या चित्रपटातची गीते ज्येष्ठ कवी डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिले.
नानांचा अभिनयाचे प्रचंड कौतुक
वसंत सबनीस यांच्या ‘तमासगीर’ या नाटकावर आणि पटकथेवर ‘राघू मैना’ चित्रपट आधारलेला आहे. तमाशा कलावंत स्टेजवर लोकांचे मनोरंजन करत असताना स्वतःची वैयक्तिक दुःखे कशी बाजूला ठेवतात आणि पडद्यामागे त्यांचे जीवन किती संघर्षाचे असते, याचे जिवंत चित्रण यात करण्यात आले आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रचंड कौतुक झाले.
कलावंत व रसिकांना लाभला सहवास
‘राघू मैना’ चित्रपटातच्या चित्रीकरणाच्या काळात नाना पाटेकर यांचे अकोल्यात मुक्काम होता. यावेळी अनेक अकोलेकर कलावंत व रसिकांना त्यांचा सहवास लाभला. भेटीचा योग जुळून आला. नाना पाटेकर यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने अनेक जण भारावून गेले होते. आज नानांच्या अचानक जाण्याने अकोल्यातील कला विश्वात शोककळा पसरली आहे.
डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, ‘बोलू शकत नाही’
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आज अचानक नानांच्या जाण्याच्या वृत्ताने डॉ. विठ्ठल वाघ यांना दुःख अनावर झाले. काहीही बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.
