गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैगा आदिवासीबहुल भागातील बालमृत्यू आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवार १ ऑक्टोबर रोजी या भागाचा दौरा करून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बालाघाटमधील परिस्थिती पाहिल्यानंतर देशाच्या मध्यभागी सरकारच अस्तित्वात नसल्यासारखे वाटल्याची टिप्पणी त्यांनी केली. कुपोषण, अपुऱ्या आरोग्य सुविधा, बेरोजगारी आणि आदिवासींच्या हक्कांच्या प्रश्नांवरून त्यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारला लक्ष्य केले.
बालाघाट जिल्ह्यातील जगला गावात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुपोषण आणि अन्य आजारांमुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले असतानाही पीडित कुटुंबांना पुरेशी आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक कुटुंबांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
वनहक्क आणि रोजगाराच्या प्रश्नांवर बोट
बालाघाटमधील जमीनविषयक वाद, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील त्रुटींवरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारी योजनांचा लाभ देताना एका योजनेतून लाभार्थ्यांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांना योजनांच्या अपेक्षित लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आदिवासींना सन्मान आणि हक्क मिळावेत’
भाजप सरकार विकासाच्या घोषणा करीत असले, तरी प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. बालाघाटमधील परिस्थिती ही प्रशासकीय व्यवस्थेतील अपयशाचे उदाहरण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आदिवासींना ‘वनवासी’ऐवजी ‘आदिवासी’ संबोधत त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि हक्कांचा सन्मान केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी समाजाला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि घटनात्मक हक्क मिळणे आवश्यक असल्याचे सांगत, काँग्रेस सत्तेत आल्यास या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बालाघाटमधील प्रश्नांवरील त्यांच्या टीकेमुळे आदिवासी भागांतील विकास, योजनांची अंमलबजावणी आणि आरोग्य व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
