Rahul Gandhi on Subodh Kumar Singh : नागपूर: NEET (UG) 2026 ही ३ मे रोजी झालेली परीक्षा तब्बल ९ दिवसांनंतर रद्द करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली. मोठ्या अपेक्षेनं पेपर दिल्यावर अभ्यासातून मोकळं होऊन निकालाकडे डोळे लावून बसलेल्या देशभरातल्या लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत ढकलले गेले. कारण हा पेपर फुटल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलं. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नीट पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या आरोपांदरम्यान एनटीएच्या माजी संचालकावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी आरोप केले होते, “ज्या व्यक्तीच्या कार्यकाळात नीट २०२४ मध्ये गंभीर गैरव्यवहार (पेपर लीक) झाले, त्या व्यक्तीला मोदी सरकारने शिक्षा करण्याऐवजी बक्षीस म्हणून महत्त्वाची पोस्टिंग दिली आहे”. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर एनटीआयचे माझे महासंचालक कुठल्या पदावर आहेत ही चर्चा सर्वत्र रंगली आहे. यानंतर ते आता छत्तीसगड सरकारमध्ये मुख्य सचिव असल्याची माहिती आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आहे विशेष.
राहुल गांधी यांनी माजी महासंचालक सुबोध कुमार सिंह यांचा उल्लेख केला आहे, जे २०२४ मध्ये एनटीएचे डीजी (Director General) होते. राहुल गांधींनी एक्स माध्यमांवर पोस्ट करत म्हटले की, “एक काम करा, स्वतः गुगल करा: नीट २०२४ च्या भयंकर चोरीच्या वेळी एनटीएचा महासंचालक कोण होता, आणि मोदी सरकारने त्याला आज कुठे बसवले आहे?”.राहुल गांधींचा दावा आहे की, या गैरव्यवहारांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे.सध्याची नियुक्ती: रिपोर्टनुसार, सुबोध सिंह यांना नंतर त्यांच्या मूळ छत्तीसगड कॅडरमध्ये पाठवण्यात आले आणि ते सध्या छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत.
काय झाले होते २०२४ मध्ये
नीट च्या परीक्षेबद्दल वाद हे काही नवीन नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं काही तक्रारी समोर येत आहेत. उच्च शिक्षणाच्या रत्यावरचा एक निर्णायक टप्पा असलेल्या या परीक्षेवर, तिच्यासाठी असलेल्या व्यवस्थेवर, निकालांवर आणि सुरक्षेवर प्रश्न विचारले गेले. या महत्वाच्या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. कारण घटनाही तशाच घडल्या होत्या. २०२४ सालच्या परीक्षेबाबतही असंच पेपरफुटी आणि अन्य बेकायदेशीर कृतींचे प्रकार समोर आले होते. मात्र ते निकाल ४ जूनला जाहीर झाल्यावर प्रकाशात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. यावेळी असलेले महासंचालक सुबोध सिंग यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर त्यांना मोदी सरकारने छत्तीसगडमध्ये मोठ्या पदावर पाठवून बक्षीस दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
