गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैगा आदिवासी भागात बालमृत्यूच्या घटनांनी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी जगला गावाला भेट दिली. विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. या वेळी परिसरातील आरोग्य सुविधांची दुरवस्था, कुपोषण आणि मलेरियाच्या समस्यांबाबत माहिती घेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली. या प्रश्नाला संसदेत वाचा फोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी दौऱ्यादरम्यान बिरसा विकासखंडातील माटे येथील प्राथमिक शासकीय शाळेला भेट दिली. सुमारे १५ मिनिटे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अभ्यासाची, शैक्षणिक सुविधांची आणि मध्यान्ह भोजन योजनेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादानंतर त्यांनी जगला गावाकडे प्रयाण केले.
सरकारकडून पुरेशी दखल घेतली जात नाही
जगला गावात आतापर्यंत विविध आजारांमुळे पाच बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भूरिया यांनी बैगा आदिवासीबहुल परिसरातील आरोग्यविषयक परिस्थिती आणि स्थानिक समस्यांची त्यांना माहिती दिली. कुपोषण आणि मलेरियासारख्या आजारांमुळे बालकांचे मृत्यू होत असताना सरकारकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केले.
