अकोला : किरकोळ कारणांसाठी रेल्वेेेत ‘चेन पुलिंग’ करत असला तर आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन मोठी कारवाई होऊ शकते. गेल्या दोन महिन्यात तब्बल ४२६ जण दोषी आढळले असून लाखोंचा दंड वसूल केला आहे.रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ‘अलार्म चेन पुलिंग’ची सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, अलीकडच्या काळात ‘अलार्म चेन पुलिंग’ (ACP) चा वापर अनेक वेळा चुकीच्या व विविध कारणांसाठी केला जात आहे. त्यामध्ये रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. या कारणांमध्ये चुकून चेन ओढणे, प्रवासी वेळेत गाडीमध्ये चढू न शकल्यामुळे चेन ओढणे, मोबाइल फोन खाली पडणे किंवा इतर किरकोळ स्वरूपाची कारणे समोर आली आहेत.

इतर गाड्यांनाही फटका

रेल्वेगाडीमध्ये ‘अलार्म चेन पुलिंग’चा चुकीचा वापर झाल्यास त्याचा फटका केवळ संबंधित गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाही, तर त्यानंतर येणाऱ्या इतर गाड्यांनाही बसतो. एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी ‘अलार्म चेन पुलिंग’चा गैरवापर केल्यास शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

भुसावळ विभागात अलार्म चेन पुलिंग घटनांवर लक्ष ठेवले जाते. डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नोंदवलेली अलार्म चेन पुलिंगचे एकूण ४९५ प्रकरणे झाली. त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या ४२६ आणि वसूल करण्यात आलेल्या दंड एकूण एक लाख ४३ हजार २०० रुपये आहे. विविध गाड्यांमध्ये ही कारवाई झाली.

इतरांना होणारा त्रास टाळा

प्रवाशांनी किरकोळ किंवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याचे प्रकार टाळावेत, अन्यथा त्यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अलार्म चेन ओढण्याचा गैरवापर करणे हे रेल्वे कायदा कलम १४१ अंतर्गत गुन्हा आहे. रेल्वे प्रवाशांनी आपल्या गाडीच्या वेळेपूर्वी स्थानकावर पोहोचावे तसेच मर्यादित सामान सोबत ठेवावे.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या किंवा व्हिलचेअरचा वापर करावा. त्यामुळे वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचता येईल आणि गाडीत सुरक्षित चढता येईल. यामुळे किरकोळ कारणांसाठी अलार्म चेन चा वापर करण्याची गरज भासत नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.