अकोला : रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट असून मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने वर्षभरात १६२५.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. आतापर्यंतचे एका वर्षातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून वर्षभरात तब्बल ४३४.१७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेच्या तिजोरीत भरघोस उत्पन्न प्राप्त होत असतानाही प्रवासी सेवा सुधारण्याची गरज दिसून येते.
रेल्वेकडे उत्पन्नाचे विविध स्त्रोत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने आपल्या उत्पन्नात मोठी वाढ केली. भुसावळ मंडळामध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवून साडेसात लाख प्रकरणांमध्ये ५६ कोटीची रक्कम वसूल केली गेली. जाहिरात महसुलात ७.५८ कोटी, तर पार्सल महसूल २९.९६ कोटी प्राप्त झाला. शेतकरी समृध्दी विशेष रेल्वे चालवून २५ फेऱ्याद्वारे एकूण ४३०२.९ टन मालाची वाहतूक केली. त्यातून १.५५ कोटी रुपये मिळाले. भुसावल मंडळाच्या सर्व स्थानकांवर आरक्षित खिडक्या डिजिटल करण्यात आल्या. यूटीएस तिकीट विक्रीत ९४.३४ टक्के वाढ झाली. मालभाडे महसुलाचे लक्ष्य ५९४.८१ कोटी निश्चित केले असताना यातून ६४५.७६ कोटींचा महसूल प्राप्त केला. कॅटरिंग सेवेतून १०.९२ कोटीचे उत्पन्न मिळवले.
भुसावल मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवासी महसुलाच्या विक्रमाला पार करत एक ऐतिहासिक उपलब्धी मिळवली. गेल्या वर्षी ८४४.३३ कोटी प्रवासी महसूल मिळवला होता, तर यावर्षी ८५८ कोटी रेल्वे महसूल प्राप्त झाला आहे. यावर्षी तब्बल ४३४.१७ लाख प्रवाशांची संख्या नोंदवली. मागील वर्षापेक्षा पाच टक्के जास्त आहे. लगेज महसुलात देखील वाढ झाली. गेल्या वर्षी १.४९ कोटीवरून यावर्षी २.३८ कोटीचा लगेज महसूल प्राप्त झाला. भुसावल मंडळाने इतर महसुलातून २७.८० कोटींचे उत्पन्न प्राप्त केले. गेल्या वर्षी पेक्षा १२.३४ टक्के वाढ दर्शवते. हा महसूल स्थानक शुल्क, पार्किंग शुल्क, विविध सेवा शुल्क, भाडे आणि इतर संबंधिताकडून मिळाला.
भुसावल मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये माल वाहतूक, प्रवासी वाहतूक सेवा आणि इतर कोचिंग महसूल एकत्र करून १६२५.४६ कोटी रेल्वे महसूल म्हणून मिळवला आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर आणि सतत रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांमुळे उत्पन्न वाढीवर परिणाम झाला आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक इति पांडे यांच्या नेतृत्वात रेल्वेच्या भुसावळ मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.