scorecardresearch

वर्धा: देशभरातील अडीच हजारावर रेल्वे थांबे बंद; रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…

प्रवास सोयीचा व सुरक्षित व्हावा म्हणून सर्वांचीच रेल्वेला पहिली पसंती असते. गरीब व श्रीमंत असा भेद न करता सर्वांचेच ओझे वाहणाऱ्या रेल्वे गाड्या बंद पडल्यास किती असह्य होते ते करोना काळात दिसलेच.

Railway Minister Ashwin Vaishnav
रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव

प्रवास सोयीचा व सुरक्षित व्हावा म्हणून सर्वांचीच रेल्वेला पहिली पसंती असते. गरीब व श्रीमंत असा भेद न करता सर्वांचेच ओझे वाहणाऱ्या रेल्वे गाड्या बंद पडल्यास किती असह्य होते ते करोना काळात दिसलेच. त्यावेळी बंद झालेल्या गाड्यांपैकी काही अद्याप बंद असून काहींचे थांबे सुरूच झालेले नाहीत. याची झळ पोहचत असल्याने अनेक नागरिक खासदारांकडे धाव घेत आहेत. हा प्रश्न कायमचा मार्गी लागावा म्हणून खासदार रामदास तडस हे रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांना भेटण्यास गेले.

हेही वाचा >>>नागपूर: जागतिक स्तरावर संस्कृतचा स्वीकार व्हावा; निवृत्त सरन्यायाधीश बोबडे यांची अपेक्षा

पुलगाव, सेवाग्राम, धामणगाव, चांदुर व अन्य काही स्थानकांवर गाड्या पूर्ववत सुरू झालेल्या नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. खा.तडस याविषयी सतत पाठपुरावा करीत असल्याने रेल्वेमंत्र्यांनी खरे ते काय एकदाचे सांगून टाकले. मंत्री म्हणाले की, प्रश्न तुमच्या क्षेत्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा आहे. अडीच हजाराहून अधिक थांबे बंद आहेत. काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कारण अनेक रेल्वेमार्गांची कामे सुरू आहेत. काही भागात नवे मार्ग टाकणे सुरू आहे. काही मार्ग धोकादायक म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ब्रिटिश काळापासून काही मार्गांवर वाहतूक सुरू आहे. त्यात कधीच दुरुस्ती झाली नाही. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले. पुढील पिढीसाठी तरतूद म्हणून नवे मार्ग व दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. थोडी कळ सोसा. येत्या सहा महिन्यांत सर्व पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. हे ऐकून खासदार तडस चकित झाले. प्रश्न केवळ माझ्या मतदारसंघाचाच नाही तर संपूर्ण देशाचा असल्याने कळ सोसलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या