scorecardresearch

प्रलंबित रेल्वे प्रकल्पांवर प्रभूकृपेची अपेक्षा!

रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर प्रभू यांचा हा पहिलाच अधिकृत नागपूर दौरा आहे.

प्रलंबित रेल्वे प्रकल्पांवर प्रभूकृपेची अपेक्षा!
रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर प्रभू यांचा हा पहिलाच अधिकृत नागपूर दौरा आहे.

रेल्वेमंत्री आज नागपुरात, विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे उद्या, मंगळवारी नागपूर दौऱ्यावर येत असून वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ताहिक) गाडीच्या प्रारंभ आणि विविध रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण, भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेले प्रकल्प अजूनही कागदावर असून त्यावर प्रभू कृपा होते की ते पुन्हा दुर्लक्षित राहते, याकडे नागपूरकरांचे डोळे लागले आहे.

रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर प्रभू यांचा हा पहिलाच अधिकृत नागपूर दौरा आहे. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते अजनी-पुणे गाडीला हिरवा झेंडी दाखवण्यात येणार आहे. सोबतच ते नागपूर-अमृतसर-नागपूर वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ताहिक) आणि पुणे-अमरावती-पुणे वातानुकूलित एक्सप्रेस (साप्ताहिक) गाडय़ांची घोषणा करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्य़ातील वडसा-गडचिरोली नवीन रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच काही प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांर्तगत मध्यप्रदेशात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, वर्धा जिल्ह्य़ात रेल्वेस्थानकावरील सुविधा, रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

नागपूर ते इटारसी तिसरा मार्ग, वर्धा ते बल्लारशा तिसरा मार्ग, वर्धा ते नागपूर तिसरा मार्ग, नागपूर स्थानकावर ५ लिफ्ट आणि पादचारी पूल, गोधनी ते कळमना रेल्वेमार्गाचे (कॉर्ड लाईन) दुहेरीकरण, अजनी स्थानकाला सॅटेलाईट टर्मिनस, जल पुनचक्रीकरण केंद्र, इतवारी स्थानकावर कोचिंग डेपो आणि मोतीबाग कार्यशाळेत डब्यांच्या दुरुस्तीची सुविधा आदी सर्व प्रकल्पांची कोनशिला रेल्वेमंत्र्यांचे हस्ते ठेवण्यात येणार आहे.

रेल्वे रुळांची रंगरंगोटी

रेल्वेमंत्र्याच्या कार्यक्रम फलाट क्रमांक १ वर असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कधी नव्हेतर रेल्वे रुळांना देखील रंग लावले आहे. फलाट क्रमांकवरील सामान्य प्रतीक्षालयात व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तेथे मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहे. अजनी येथून गाडी रवाना होताना या स्क्रिनवर दिसणार आहे. याशिवाय येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे.

..असाही योगायोग

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाचा विवाह सोहळा नागपुरात आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे त्या कार्यक्रमासाठी येत असून विदर्भ तसेच मध्यप्रदेशातील रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन करीत आहे. यामुळे सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाचा विवाह आणि रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण, भूमिपूजन असा योग जुळून आला असेच म्हणावे लागेल. प्रभू हे ‘टेक्नो सेव्ही’ असून नवीन गाडी सुरू करण्यासाठी साधारणत स्थानकावर जात नाही. दिल्लीत कार्यालयात बसून रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवतात. त्यामुळे पैसा आणि वेळेची बचत होते. त्यांनी ११ फेब्रुवारी २०१५ ला नागपूर-रीवा एक्सप्रेसचा अशाच प्रकारे शुभारंभ केला होता.

गाडी एकीकडे, कार्यक्रम दुसरीकडे

अजनी-पुणे गाडीच्या शुभारंभाचा राजकीय लाभ घेण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नागपुरात येऊन देखील या गाडीला प्रत्यक्ष हिरावी झेंडी ते दाखवू शकणार नाही तर रिमोटद्वारे गाडीचा शुभारंभ करणार आहे. अजनी रेल्वे स्थानकावर कार्यक्रम घेण्यास पुरेशी जागा नाही. त्यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती स्थानकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी रेल्वेगाडी नागपूर स्थानकावर आणण्यात येणार होती. परंतु एका स्थानकाची गाडी दुसऱ्या स्थानकावरून सोडणे नियमाला धरून नाही आणि त्यावरून टीका होईल म्हणून नागपूर स्थानकापासून ३ किलो मीटर अंतरावरील अजनी येथून गाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री प्रभू हे रिमोटद्वारे गाडीचा शुभारंभ करतील.

‘मिस्टिंग सिस्टम’ नादुरुस्त

प्रवाशांना उकाडय़ापासून दिलासा मिळावा म्हणून नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर ‘मिस्टिंग सिस्टम’ बसवण्यात आले आहे. या महिन्यातच ते नादुरुस्त झाले असून प्रवाशांना गारवा देण्याऐवजी ओले करू लागले आहे. गाडीच्या प्रतीक्षेत फलाट क्रमांक १ वर उभ्या प्रवाशांना यामुळे ओले व्हावे लागत आहे. या फलाटावर टाईल्समध्ये गॅप आल्याने पाय मुरगळण्याचे प्रकार घडले आहेत.

या प्रकल्पाचे लोकार्पण होणार

नागपूर स्थानकावरील मोफत वाय-फाय सुविधांचे  लोकार्पण होणार आहे.

चंद्रपूर स्थानकाचा दर्शनी भाग, परिसरामध्ये सुधारणा आणि  रॅम्पसह पादचारी पुलाचा विस्तार करण्यात आला आहे.

नागपूर बल्लारपूर, वर्धा आणि सेवाग्राम स्थानकांवर एलईडी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

बल्लारपूर स्थानकावरील दर्शनी भाग, परिसरामध्ये सुधारणा आणि प्लेटफार्म क्रमांक १ आणि ४ वर इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेटर

प्रणालीची सुविधा करण्यात आली.

आमला-परासिया विद्युतीकरण झाले आहे.

प्रलंबित प्रकल्प आणि अपेक्षा

नागपूर ते दिल्ली थेट गाडी सुरू करणे

प्रतीक्षा यादीतील तिकीट रद्द केल्यास पैसे कापण्यात येऊ नये

रेल्वे नीर बॉटलिंग प्लॉट, बुटीबोरी

नागपूर रेल्वेस्थानक ‘वर्ल्ड क्लास’ म्हणून विकसित

नागपूरला झोनचा दर्जा देणे

नागपुरात रेल्वे यात्री निवास विकसित करणे

इतवारी ते नागभीड रेल्वेमार्ग ब्रॉडगेज

नरखेड-अचलपूर शकुंतला मार्ग

वॅगन रिपेअर वर्कशॉप, बडनेरा, अमरावती

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-05-2017 at 03:18 IST

संबंधित बातम्या