रेल्वेमंत्री दरवर्षी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जी आकडेवारी सादर करून लाखो देशबांधवांवर फुकट प्रवास करणारे असा शिक्का मारत असले तरी तिकीट तपासणीस महसूल उद्दिष्ट गाठण्यासाठी बनावट प्रकरण दाखल करत असल्याने फुकटय़ा प्रवाशांची आकडेवारी निव्वळ बनवेगिरी असल्याचे उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेतील अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी पथक तयार करण्यात आले. याशिवाय विशेष तिकीट तपासणी अभियानही राबवण्यात येते. तिकीट तपासणींना महसुलाचे मासिक उद्दिष्टे देण्यात आल्याने अनधिकृत प्रवाशांना रोखण्यापेक्षा त्यांना दंड आकारून अधिकृत प्रवासी म्हणून प्रवास करू देण्याची शक्कल लढवण्यात येत आहे.

पथकातील तिकीट तपासणीसांना अनियमित तिकीट, विनातिकीट प्रवास आणि बुकिंग न केलेले सामान आदींचे मासिक उद्दिष्ट दिले जाते. रेल्वे तिकीट तपासणीसांची चार प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर नियुक्त, धावत्या गाडीत तपासणी करणारे, महिला टीटीई आणि स्पोर्ट्स कोटय़ातील टीटीई असे चार प्रकार आहेत.

रेल्वेस्थानकावरील तिकीट तपासणीसांना महिन्याला एक लाख रुपये आणि धावत्या गाडीत तपासणी करणाऱ्यांना दीड लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. सामान्य श्रेणीतील तिकीट असलेल्या प्रवाशाला स्लिपर क्लासच्या डब्यात बसू देण्यासाठी दंड आकारण्यात येते.

तसेच प्रतीक्षा यादीतील तिकीट असल्यास दंड घेण्यात येते. वास्तविक या सर्व प्रवाशांकडे तिकीट असते, परंतु महसूल उद्दिष्ट गाठण्यासाठी या सर्व प्रवाशांना सोयीनुसार अनियमित, विनातिकीट तर कधी सामान बुक न करणारा प्रवासी या प्रकारात नोंद केली जात आहे.

महसूल उद्दिष्ट गाठण्यासाठी क्लृप्ती वर्षभरात १३.६२ कोटींची वसुली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि सामान विना बुकिंग नेणे आदींचे २ लाख ९९ हजार २७० प्रकरणे दाखल केली. यातून रेल्वेने प्रवाशांकडून १३ कोटी ६२ लाख रुपये दंड वसूल केला. त्यांच्या आधी २ लाख ७८ हजार १६९ प्रकरण दाखल करण्यात आले आणि त्यातून १२.२४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान अनियमित तिकीटधारक प्रवाशांकडून ८८३.७० लाख वसूल करण्यात आले. विनातिकीट ८५ हजार ७६० प्रकरणातून ४४०.९७ लाख रुपये वसूल करण्यात आले, असे मध्य रेल्वेने केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

रेल्वेचा नियम

कनिष्ठ श्रेणीतील डब्याचे तिकीट असलेला प्रवासी उच्च श्रेणीतील डब्यात आढळून आल्यास प्रवाशाकडून दोन्ही श्रेणीच्या प्रवास भाडय़ातील फरक आणि २५० रुपये दंड आकारण्यात यायला हवे. त्यानंतर त्या प्रवाशाला पुढील रेल्वेस्थानकावर त्याच्या मूळ डब्यात पाठवण्यात यायला हवे. रेल्वे तिकीट तपासणीसांना उद्दिष्ट असल्याने ते या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावर उभे राहून नागपूर ते बिलासपूर, रायपूर, दुर्ग, नागपूर ते अमरावती, अकोला या स्थानकादरम्यानचा दोन तिकिटांमधील फरक आणि दंड आकारून अप्रत्यक्ष त्या प्रवाशाला अधिकृतरित्या प्रवासाची संधी दिली जात आहे.

विनातिकीट प्रवासी नगण्य

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची किंवा विना बुकिंग सामान नेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. अलीकडे प्रवास कमीत कमी सामानानिशी करण्याकडे लोकांचा कल आहे. पर्याय नसल्याने विनातिकीट प्रवास केल्याचे दिसून येते. काही विद्यार्थी ‘थ्रील’ म्हणून विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत. परंतु पकडले गेल्यावर ते पुन्हा असे धाडस करत नाहीत, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway ticket issue in nagpur
First published on: 27-05-2016 at 02:58 IST