वर्धा : सध्या राज्यात पालिका निवडणुकीचा हंगाम सूरू आहे. निवडणुका म्हटले जल्लोष. विजयी उमेदवार व त्याचे समर्थक प्रामुख्याने फटाके फोडून, आतषबाजी करीत आनंद व्यक्त करतात. २१ तारीख ही आनंदाची म्हणजे निकालाची. फटाके तर फुटणारच. पण थांबा आता. कारण फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीत पावसाने उत्पादन थांबले. देशभराच्या पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. जल्लोष कसा, असा प्रश्न संभाव्य विजेत्यांना पडू शकतो.
शिवकाशी हे देशातच नव्हे तर विदेशात फटाके पुरविणारे मोठे केंद्र आहे. तामिळनाडू येथील विरुधूनगर जिल्ह्यात हे गाव आहे. या गावाच्या आसपास सत्तूर व राजपाल्यम या गावात फटाके उत्पादन होते. पण दिवाळीनंतर दीड महिने सतत पाऊस पडला. परिणामी उत्पादन ठप्प पडले. देशभरातील आवक थांबली. लग्नप्रसंगी मागणी असते. ती अडकली आहे. आता तर राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होणार. फटाके फोडण्याची ही तर मोठी संधी.
पण पुरवठा थांबल्याने आता या आनंदावर विरजण पडू शकते. फटाक्यांचे एक ठोक विक्रेते सतीश नाथाणी म्हणतात की शिवकाशीत खूप पाऊस झाल्याने आवक कमी आहे. उत्पादन सूरू झाले. पण वाहतुक अडचण म्हणू माल पोहचला नाही. आहे ते विकणार. प्रामुख्याने विजयी उमेदवार लवंगी फटाक्यांची लड घेतो. मोठा जल्लोष असल्यास आतिषबाजी केल्या जाते. पण मुद्दा असा की सगळे वेळेवर फटाके घेतात. विजय हमखास म्हणून फटाके घेऊन ठेवणारे कुणीच नसतात. म्हणून आम्ही आगाऊ बुकिंग शिवकाशिस करून ठेवत नाही. जे आहे ते घ्या, अशी स्थिती असते. पण नागपूर, जळगाव, धुळे येथे बडे स्टॉकीस्ट आहेत. बोलावता येवू शकतात. सध्या तिथे पण किती असतील सांगता येत नाही. लग्न सोहळे असतात या महिन्यात म्हणून जो माल आहे, त्यातून द्यावे लागणार, असे नाथाणी यांनी सांगितले.
तर रामनगरातील एक विक्रेते सांगतात की पावसाने अपेक्षित फटाके आले नाहीत. पण अडचण येणार नाही. प्रभागातील विजेते फार फटाके फोडत नाही. लाखभरात आटोपते. खरी आतिषबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीनंतर झाली होती. गावात फटाके शिल्लक नव्हते. मग डॉ. पंकज भोयर हे आमदार झाले तेव्हा फटाके फुटले. नगरसेवक फार फोडत नाही. पण शिवकाशितील पावसाने गणित बिघडले, हे खरे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ही निवडणूक पैसे कमाविण्याची एक संधी म्हणून जाहिरातबाजी झालीच. २१ तारखेस निकाल लागणार. विजयाचा उत्साह द्विगुणित करा. सर्व प्रकारचे फटाके होलसेल भावात उपलब्ध आहेत.
