पूर्व विदर्भात कोटय़वधींचे नुकसान 

नागपूर : राज्यातील भात उत्पादक (धान) जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्य़ांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कापणी आणि मळणीसाठी तयार असलेला धान पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी मोसमात पेरणीसाठी ज्वारी आणि चणा मोफत देण्यात येणार असल्याचे लोकसत्ताला सांगितले.

गेल्या आठवडाभरापासून  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्य़ात काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. बहुतांश शेतकऱ्यांचा धान कापून वाळवण्यासाठी शेतात ठेवला होता. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आणि वाळत घातलेले धान ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची वर्षांची मेहनत वाया गेली. कारण, काहींचे धान सडले तर काहींचे धानावर पाणी गेल्याने लाल (पाखड) होणार आहेत. या धानाची खरेदी कोणी करीत नाहीत. सरकारी धान्य केंद्रावर देखील या धानाला भाव दिला जात नाही. यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या सावली तालुक्यातील सायखेडा येथील शेतकरी कृष्णा मुळे म्हणाले, संपूर्ण आठ एकरमधील धान पाण्याखाली आहे. पाण्याचा निचारा करण्यासाठी नाल्या करण्यात येत आहे. परंतु सर्वत्र पाणी आहे आणि शेत खोल असल्याने पूर्ण पाणी वाहून जाऊ शकत नाही. पहिल्यांदा १५ नोव्हेंबरला पाऊस झाला.  धान उचलून वाळू टाकले. तीन दिवसांनी पुन्हा पाऊस झाला आणि संपूर्ण धान खराब झाले आहे. 

अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील  सुमारे १७ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सावली आणि सिंदेवाही तालुक्यांना बसला आहे. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्य़ात देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. या जिल्ह्य़ात सुमारे ४० टक्के धान लागवडी क्षेत्राचे नुकसान झाल्याचे त्या-त्या जिल्ह्य़ातील कृषी अधिकारी आणि शेतकरी सांगत आहेत.

पेरणीसाठी ज्वारी, चणा मोफत देणार

मी चंद्रपूर जिल्ह्य़ातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसान मोठे आहे. पंचनामे झाल्यानंतर वास्तविक नुकसानीचा अंदाज येईल. राज्य सरकारतर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारी आणि चणा मोफत देण्यात येईल.

विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री.