नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट दिवाळीनिमित्त होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सणांवर चर्चा झाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. गडचिरोली दौऱ्यासाठी  मुख्यमंत्र्यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुंबईत राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवात,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर सत्तापक्षांची मनसेसोबत जवळीक निर्माण झाल्याची चर्चा रंगली. यासंदर्भात शिंदे यांना विचारले असता त्यांनी ही बाब फेटाळून लावली. राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मी आणि फडणवीस कार्यक्रमाला गेलो होतो.  ही दिवाळी भेट होती. सणांवरच चर्चा झाली, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.  यंदा राज्यात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे, असेही शिंदे म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला धडकी भरली आहे. टीका करणे त्यांचे कामच आहे, पण त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षांत जे निर्णय घेतले नाही ते आम्ही तीन महिन्यात घेतले. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. परतीच्या पावसामुळे झालेल्या पीकहानीचे पंचनामे करायला सांगितले, निकषात बसो अथवा न बसो, सर्वाना नुकसान भरपाई देऊ,  असेही शिंदे म्हणाले.

गडचिरोलीतील पोलीस आपला जीव धोक्यात टाकून, कुटुंबापासून दूर राहात कर्तव्य बजावत असतात. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यांच्यासोबत दरवर्षी दिवाळी साजरी करीत होतो. मुख्यमंत्री झाल्यावरही ही प्रथा कायम ठेवण्यासाठी भामरागडला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘समृद्धी’ लवकरच सुरू होणार

नागपूर-मुंबई ‘समृद्धी’ द्रूतगती महामार्ग नोव्हेंबरमध्ये  शिर्डीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.  त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे, असे शिंदे म्हणाले.

शहरी नक्षलवाद मोडून काढू

गडचिरोलीतील नक्षलवाद कमी होत असून यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. मात्र शहरी नक्षलवादामध्ये वाढ होत आहे. पोलिसांचे त्याकडे लक्ष आहे. त्याचाही नक्कीच बीमोड करणार, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.