गोंदिया : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक दावा केला आहे.
मी नेहमी आपल्या संबोधनात सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कशाप्रकारे कार्य करीत असे. महाराज असताना अशा घटना घडल्या असत्या तर गुन्हेगारांच्या पायाखालचे चौरंग काढून घेण्यात आले असते. मात्र, अशा प्रशासनाची अंमलबजावणीच कुठेही होताना दिसत नाही. मुळात आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारांवर राहिलेला नाही. त्यामुळेच कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापूरसारख्या घटना घडताना दिसतात. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे प्रशासनासाठी लाजिरवाणे आहे, असे सांगतानाच बदलापूर येथील चिमुकल्या विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराची घटना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे उघडकीस आली, असा दावा राज ठाकरे यांनी गोंदियात केला.
हेही वाचा – नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…
राज ठाकरे म्हणाले, प्रशासनाच्या गळचेपी भूमिकेमुळेच पोलिसांना आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सूट राहिलेली नाही. यांनी इतका दबाव पोलिसांवर निर्माण केला आहे की पोलिसांनाही वाटते की काही कमी जास्त झाले की बळी आपलाच जाणार व प्रशासन आपले हात वर करणार. त्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहे. माझे तर येथे उपस्थित पोलिसांनाही म्हणणे आहे की, एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मग दाखवतो की कसे शासन व प्रशासन चालविले जाते. यांच्या अशा निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेला नाही. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे, अशा प्रकारे शासन व्यवस्था चालते का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उद्देशून उपस्थित केला.
आज महाराष्ट्रातील राजकारणाचा काय विचका करून ठेवलंय, एका-एका आमदारांवर ५० खोके घेवून स्वतःला विकल्या गेल्याचे आरोप होतोय, महाराष्ट्रात असे यापूर्वी कधीच ऐकायला मिळत नव्हते, पण आज हे सगळं सर्रास सुरू आहे, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘बदल म्हणून जनता मनसेकडे पाहात आहे’
आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे शासन जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे आता जनता बदल म्हणून मनसेकडे पाहात आहे. कोणताही पक्ष सुरुवातील लहानच असतो, तो प्रस्थापितांशी लढूनच वर येतो. स्वातंत्र्यानंतर देशात फक्त काँग्रेस पक्ष प्रस्थापित होता. त्याविरुद्ध लढूनच इतर पक्षांनी आपली वाटचाल सुरू केली आणि बळकट झाले. इतर झाले तसेच आपल्यालाही आजच्या प्रस्थापितांविरुद्ध लढूनच पुढे यावे लागणार आहे. कुणी संधी देणार नाही, संधी हेरून घ्यावी लागणार आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना केले.