नागपूर : राजस्थान सायबर गुन्हेगारांचा गड बनत चालले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत येथील सराईत गुन्हेगार पारंपरिक गुन्ह्यांचे बोट सोडून आता चेहरा न दाखवता सायबरच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूकीकडे वळत आहेत. जेमतेम शिक्षण घेतलेले गुन्हेगार यातून मास्टरमाईंड बनत आहेत. असाच एक प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला.

जेमतेम १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राजस्थानातील एका सराईत सायबर भामट्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला, या गुन्हेगाराने सायबर फसवणूकीत मास्टरकी मिळवली आहे. संदीप महेंद्र दान चारण (२९, रा. खुंडिया, जि. चुरू, राजस्थान) असे त्याचे नाव आहे.

खात्याच्या क्रमांकावरून सापडली कडी

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राघुनाथ प्रसाद कुमार गुजर (५७) यांची ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून ३ लाख ८५ हजारांची फसवणूक झाली होती. एका बँक खात्यातून ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला राजस्थान राज्यात एक बँक खात्याची कडी सापडली. शोधमोहीम राबवून पथकाने संदीप महेंद्र दान चारण (२९, रा. खुंडिया, जि. चुरू, राजस्थान) याला ताब्यात घेतले.

फसवणूकीचे जाळे पुणे, कोल्हापूरातही

ऑनलाइन फसवणुकीचे जाळे उभारणाऱ्या चारण याला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथक चारने राजस्थानातून अटक केली. बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाखल ३ लाख ८५ हजारांच्या फसवणूक प्रकरणासह त्याने महाराष्ट्रातील पुणे शहर, चंदगड (कोल्हापूर), भोकरदन (जालना) आणि रतनगड (राजस्थान) येथेही चार जणांना ठगवल्याचे समोर आले. या चारही गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता, असे तपासातून निष्पन्न झाले.

ट्रान्झिट रिमांडवर आणले नागपुरात

संदीप चारण याचा गुन्हेगारी इतिहास पोलिसांनी राजस्थानातील कोटा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने ट्रान्झिट रिमांड वर त्याला नागपुरात आणून पुढील तपासासाठी आरोपीला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीकडून आणखी फसवणुकीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.