मुत्तेमवार, वासनिक यांची फटकेबाजी
जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना पक्षातील स्थानिक पातळीवरील राजकारण आणि गटबाजीच्या मुद्दय़ांवरून नेत्यांनी केलेल्या फटकेबाजीचा आस्वाद घेता आला. दरम्यान, लोकसभेत जनतेने मोदींना बघून मतदान केले होते. तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार करताना मोदींना लक्ष्य करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाला राजेंद्र मुळक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाचे व्यासपीठ नेत्यांनी व्यापले होते तर सभागृह कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. सभागृहाबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपातील एलसीडीसमोरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यांच्या उपस्थितीत माजी मंत्री, माजी आमदार यांनी कार्यकर्त्यांमुळे आम्ही आमदार, खासदार, मंत्री झालो अशी कबुली दिली आणिा कार्यकर्त्यांनी आता पक्षाला नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन केले.
मुत्तेमवार यांनी स्थानिक राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी काँग्रेसच्या मावळत्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांचे पती नाना गावंडे यांच्यापासून सुरुवात करून मुकुल वासनिक यांच्यावर शाब्दिक व्यंग केला. मुकुल वासनिक यांनी देखील भाषणाचा शेवट करताना राजेंद्र मुळक यांना ग्रामीणमध्ये लक्ष द्यावे, शहरात हस्तक्षेप करू नये, असे मुत्तेमवार यांनी बजावले होते. याची आठवण करून दिली.
ग्रामीणसोबत थोडे शहरातही लक्ष द्यावे, हे मुत्तेमवार यांचे मुळक यांना केलेले आवाहन शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना चालणार काय, असा सवालही वासनिक यांनी केला.
विधानसभेतील विरोधीपक्ष उपनेते विजय वडेट्टीवार यांनी आपसातील भांडणे चव्हाटय़ावर आणू नका, असे आवाहन पक्षातील नेत्यांना केले. भाजपने दोन वर्षांत केलेल्या जनविरोधी कामाचा पाढा जनतेसमोर कार्यकर्त्यांनी वाचला पाहिजे. भाजपचे कार्यकर्ते प्रचार-प्रसारात आघाडीवर असतात. थोडे करायचे आणि अधिक सांगण्याची त्यांची पद्धत आहे.
प्रचार तंत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागे राहू नये, जशाच्या तसे उत्तर देण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केली.
याप्रसंगी बुटीबोरी येथील विविध पक्षांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आमदार केदारांची पाठ
नागपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार यांनी मुळक यांच्या पदग्रहण सोहळ्याकडे पाठ फिरवली. काँग्रेस सातत्याने सत्तेत राहिल्याने गटबाजी आणि नेत्यांमधील हवेदावे टोकाचे आहेत. केंद्र आणि राज्यातही पराभव झाल्याने मतभेद बाजूला ठेवून नेते एकजुटीने पक्ष बांधणीसाठी कामाला लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु ‘दोरखंड जळाले पण पीळ कायम’ अशी काँग्रेसची अवस्था झाल्याचे या प्रकारावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी ‘सुनील केदार कार्यक्रमाला आले असते तर सोन्याहून पिवळे झाले असते’ या शब्दांत केदार यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा मांडला.

‘भाजपकडून हे शिका’
भाजपचे १९८४ मध्ये केवळ दोन खासदार होते. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी धीर सोडला नाही. त्यांच्याकडे कोणते मंडळ नव्हते. जि.प., नगर पंचायत नव्हते तरीपण ते काम करीत राहिले. त्यांनी जनभावना ओळखून प्रचार केला. या बाबी भाजपकडून शिकण्याची आवश्यकता असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीदेखील लोकांच्या भावनांना हात घातला पाहिजे, असा सल्लाही मुत्तेमवार यांनी दिला.