नागपूर : चंद्रपूर काँग्रेसमधील महापालिकेतील सत्तासंघर्ष अखेर मिटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांवर पडदा टाकत पक्ष नेतृत्वाने नेतृत्वाबाबतचा तिढा सोडवला आहे. महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतीभा धानोरकर यांच्या चंद्रपूर महापालिकेतील वर्चस्वाची लढाई सुरू आहे. अखेर हे प्रकरण दिल्ली गेले आणि त्यावर तोडगा काढण्यात आला. सत्तापक्ष पक्ष नेता तसचे उपमाहापौरपद वडेट्टीवार समर्थकांकडे राहणार आहे. तर महापौरपद खासदार धानोरकरगटाकडे आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेना (ठाकरे) – बहुजन वंचित आघाडीच्या गटासाठी राहणार आहे.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गटनेता आणि उपमहापौर ही दोन्ही महत्त्वाची पदे काँग्रेसमधील एकाच गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गटनेत्याची निवड प्रदेशाध्यक्षांकडून केली जाणार असून महापौरपद खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडेच राहणार आहे.

महापालिकेतील सत्तावाटपावरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक आमनेसामने आले होते. स्वतंत्र गट स्थापनेच्या हालचालींमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर समन्वय साधण्यात आला.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असून, आघाडीत सहभागी जनविकास पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ ३० आहे. बहुमतासाठी आणखी चार नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे भाजपचे २३ नगरसेवक असून शिंदे गटाचा एक नगरसेवक त्यांच्यासोबत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला असून, त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय चित्र सध्या तरी स्थिरावल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बनेल. काँग्रेस आणि मित्रपक्षाचे मिळून ३२ नगरसेवक आहेत. केवळ दोन नगरसेवक आवश्यक आहेत. चंद्रपूर महापालिकेतील तिढा सुटला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.