चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणुकीपूर्वी आघाडी झाल्याची नोंदणी न केल्यामुळे राजुरा व गडचांदूर या दोन नगर पालिकेत कॉग्रेस-शेतकरी संघटना या नगर विकास आघाडीला नगराध्यक्ष पदासाठी पंजा आणि नगरसेवक पदासाठी फुटबॉल, चष्मा व बस अशी तीन वेगवेगळी चिन्हे मिळाली आहे. तसेच भाजप बंडखोर-शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिसऱ्या आघाडीला देखील अशीच वेगळी चिन्हे मिळाल्याने उमेदवारांची अडचण झाली आहे.

राजुरा नगर पालिकेत कॉग्रेस व शेतकरी संघटनेची नगर विकास आघाडी तर गडचांदूर येथे भाजप बंडखोर, शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी अशी तिसरी आघाडी सक्रीय झाली आहे. येथे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी आघाडी तयार करतांना बराच वेळ घेतला. त्याचा परिणाम निवडणूक पूर्व आघाडी झाली नाही आणि आयोगाकडे तशी नोंद करता आली नाही. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाचे कॉग्रेसचे उमेदवार अरूण धोटे पंजा चिन्ह घेवून निवडणुकीच्या रिंगणात आहे. विशेष म्हणजे धोटे यांनाही नगराध्यक्ष पदासाठी पंजा चिन्हच हवे होते. मात्र आता दहा प्रभागातील २१ नगरसेवकांना तीन वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. यामध्ये फुटबॉल, चष्मा व बस या चिन्हाचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी वेगळे आणि नगरसेवक पदासाठी वेगळे असे चार चिन्ह असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहचतांना चांगलीच दमछाक होत आहे.

हा प्रकार गडचांदूर पालिकेत देखील झाला आहे. गडचांदूर नगर पालिकेत भाजप बंडखोर नीलेश ताजने, शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली आहे. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश ताजने आहे. त्यांना छत्री चिन्ह मिळाले तर दहा प्रभागातील (एका प्रभागात दोन) वीस नगरसेवकांना बस आणि एसी घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, दोन नगरसेवक पदांचे उमेदवार असे एकून तीन चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्याची धावपळ आघाडीच्या नेत्यांना करावी लागणार आहे. राजुरा येथे आघाडीला चार तर गडचांदूर येथे आघाडीला तीन चिन्हांचा प्रचार करावा लागत आहे. या स्वतंत्र चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

याचा फायदा रिंगणातील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. राजुरा व गडचांदूर येथे स्थापन नगर विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार साहित्य तयार करतांना अशाच प्रकारे चार व तीन चिन्ह एकाच पत्रकात टाकले आहे. त्यामुळेही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.