बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारणारे खासदार प्रतापराव जाधव आणि रावेर मतदारसंघात विजयाची ‘हॅट्रिक ‘ करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांना राजधानी दिल्लीतील प्रशासकीय कामकाज व राजकारणाचा चांगला अनुभव आहे. योगायोगाने या दोघा नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. यामुळे बुलढाणा जिल्हावासीयांच्या विकासाच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. यातही मलकापूर विधानसभा मतदारसंघात तर जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे.

रावेर मतदारसंघ जळगाव जिल्हयातील असला तरी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघ हा रावेर मतदारसंघाला जोडला आहे. यामुळे प्रशासकीयदृष्ट्या मलकापूर बुलढाणा जिल्ह्याशी संलग्न असला तर राजकीय दृष्टीने रावेर सोबत जोडला आहे.सन २००९ मध्ये देशातील लोकसंभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली होती.

हेही वाचा…गोंदिया : खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, एकाचा मृत्यू; १७ जखमी

त्यात दीर्घ काळ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ खुला झाला. तोपर्यंत बुलढाणा लोकसभेला संलग्न मलकापूर मतदारसंघ हा नवीन रचनेत रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. याला आता पंधरा वर्षे लोटल्याने खान्देश आणि विदर्भाला जोडणाऱ्या मलकापूर मत्तादरसंघवासी आता रावेरला सरावले आहे.

हरीभाऊ जावळे यांनी रावेर चे प्रतिनिधित्व केले. सन २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना रावेर मध्ये संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. २०१४, २०१९ आणि आता २०२४ असा सलग विजय त्यांनी मिळविला. या तिन्ही विजयात मलकापूर मतदारसंघाचा निर्णायक वाटा राहिला आहे.

हेही वाचा…अकोला : राज्यात वाण व तंत्रज्ञानाच्या २७८ शिफारशींना मंजुरी, आगामी हंगामापासूनच…

यंदा मलकापुरातून खडसेना ४७ हजारांचे मताधिक्य मिळाले. २०१९ मध्ये ५८ हजार तर २०१४ मध्ये ५४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता मलकापूर वासीयांच्या विकासाच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. तेथील रेल्वे स्थानक, औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) च्या समस्या आहेत. याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. खासदार खडसे यांनी नवीन उद्योग आणून विकास करणे अपेक्षा आहे.

प्रतिकूल स्थितीत यंदा खडसे यांनी विजय मिळविला आहे.सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले, तरीही त्या भाजप मध्येच राहिल्या. त्या निष्ठचे फळ म्हणजे हे मंत्रिपद होय.याशिवाय राज्यात लक्षणीय संख्येत असलेल्या लेवा पाटील, गुजर समाजाला भाजपा सोबत घट्ट जोडून ठेवण्याचे यामागे मनसुबे आहेत.

भाजपला उत्तर महाराष्ट्र्रात अपयश मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री भारती पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्ये पक्षाला पाठबळ आणि उभारी देण्यासाठी भाजपने रक्षा खडसे याना संधी दिल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा…महाराष्ट्र कुस्तीगीर संघावर सुख दुःखाचे सावट! एक पैलवान मंत्री तर दुसरा…

खासदार जाधव यांना मिळालेल्या मंत्री पदामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना खामगाव रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. राज्याने ५० टक्के खर्चाचा वाटा मान्य केला. यामुळे आता या मार्गाला गती देणे, अगोदरच अकोला खंडवा रेल्वे मार्ग आणि वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प ला गती देणे त्यांच्या कडून अपेक्षित आहे. यासाठी खडसे यांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा…गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी मतदार भाजपपासून दुरावले!

जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे हे दोन केंद्रीय मंत्री असल्याने अविकसित बुलढाणा जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि विकासाला गती, दिशा मिळणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याच्या महत्वाच्या समस्या, प्रकल्पासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.