यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यात तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्या आणि त्याचा थेट संबंध मानवी तस्करी किंवा ‘लव्ह जिहाद’शी असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहाण यांनी केला. त्यानंतर गृह व पोलीस विभागाने सर्वत्र कसून चौकशी केली, मात्र कुठेही बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या मुलींची संख्या भाजपने जाहीर केलेल्या संख्येशी जुळली नाही. भाजपने आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची कोंडी करण्यासाठी हे प्रकरण उभे केल्याची चर्चा आता भाजपच्याच अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.

बंदला हिंसक वळण

मानवी तस्करीसंदर्भात संशय निर्माण करणारी एक ‘ऑडिओ क्लिप’ सार्वत्रिक झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादशी जोडल्याने राळेगाव येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सोमवारी या घटनेच्या निषेधार्त विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या राळेगाव बंदला हिंसक वळण लागले. कार्यकर्त्यांनी संशयित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत बसस्थानक चौकात टायर जाळले. तर रविवारी रात्री जमावाने या प्रकरणाचा मुख्य संशयित मजहर कुरेशी याच्या घरावर दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शिवाय कुरेशी याच्या मालकीचे अतिक्रमित जागेवरील एक दुकान प्रशासनाने बुलडोजरने तोडले.

कुरेशी याच्यावर पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परंतु, तरीही भाजपकडून हे प्रकरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याची राळेगावात चर्चा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी राळेगाव येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहाण यांच्यासह भेट देवून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलीस चौकशी करत असून, लवकरच प्रकरणाचा संपूर्ण छडा लागेल, असे मंत्री उईके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पोलिसांच्या संख्येशी भाजपचा मेळ जुळेना

भाजपने हवा केलेल्या या प्रकरणाला अनेक कांगोरे असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी राळेगाव मतदारसंघातून गेल्या तीन वर्षात बेपत्ता, अपहरण झालेल्या तक्रारी व गुन्ह्यांची संख्या जाहीर केली. २०२३ मध्ये एकूण २२ गुन्हे दाखल झाले, या सर्व प्रकरणातील मुली सापडल्या. २०२४ मध्ये २५ गुन्हे दाखल असून, २५ गुन्हे उघडकीस आले. २०२५ मध्ये २७ गुन्हे दाखल झाले तर २६ गुन्ह्यांचा छडा लागला. २०२६ मध्ये गेल्या चार महिन्यांत १२ गुन्हे दाखल झाले आठ गुन्हे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनीही पोलिसांककडे राळेगाव तालुक्यातून बेपत्ता ३४ मुलींच्या संदर्भात एकही तक्रार दाखल नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने मतदारसंघातून ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा आरोपच निराधार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.