राय जन्मशताब्दी सोहळा

पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलाल राय यांच्या जन्मशताब्दी वर्षांला रविवारपासून सुरुवात झाली. या दोन्ही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी आहे. राय यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक अडचणींच्या काळात पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. त्यामुळेच आज भाजपला चांगले दिवस आले आहेत. अशा कार्यकर्त्यांची माहिती या पिढीतील कार्यकर्त्यांपयर्ंत, तसेच समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी येथे केले.

सुंदरलाल राय जन्मशताब्दीनिमित्त डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय, रूपा राय यावेळी उपस्थित होते.

राम नाईक यांनी यावेळी राय यांच्या कार्यकतृत्त्वाची माहिती दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राज्यात जनसंघाची धुरा सांभाळली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांमुळे आता सत्तेत असलेल्या नेत्यांना आपण कोणामुळे सत्तेवर आलो याची जाणीव होते. राय किंवा त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत. त्यांचे काम लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन नाईक यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि सुंदरलाल राय या दोन्ही नेत्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे नाईक म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भाषण झाले. दीनदयाल उपाध्याय आणि सुंदरलाल राय या दोन्ही नेत्यांच्या कामात साम्य आहे. त्यांनी जनसंघाचा पाया रचला, त्यांच्या पुण्याईमुळेच माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्यांना आता जबाबदारीच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे, असे मुख्यमंत्री फडण़वीस म्हणाले.

जनसंघाच्या काळात ज्या लोकांनी कष्ट उपसले त्यांच्यामुळेच आज भाजप केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे त्या लोकांचा विसर आताच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पडू देऊ नये, असे आवाहन गडकरी यांनी केले. जनसंघावरील बंदीच्या काळातील स्थिती आणि आताच्या भाजपची स्थिती याची तुलना केली तेव्हा नेतृत्व होते, पण जनसमर्थन नव्हते. निवडणुका पराभवासाठीच लढल्या जात होत्या. अनामत रक्कम बचावली तरी आनंद मानला जात होता. मात्र, याही स्थितीत सुंदरलाल राय यांच्यासारखे अनेक नेते व कार्यकर्ते पक्षाचा विचार घेऊन पुढे वाटचाल करीत राहिले. त्यामुळे आता पक्षाला चांगले दिवस आले, ही त्या काळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाची पुण्याई आहे, असे गडकरी म्हणाले. प्रास्ताविक आमदार अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संघाचा कडवा स्वयंसेवक कोण ? राम नाईक यांनी उपस्थित केलेला प्रश्न

म.गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादलेली असताना त्याविरोधात सत्याग्रह करणारा, सरकारने लादलेल्या संघटना बंदीविरोधात आंदोलन करणारा म्हणजेच निष्ठावंत स्वयंसेवक, अशी संघाच्या स्वयंसेवकाची वादग्रस्त व्याख्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी या कार्यक्रमात केली. संघाचा निष्ठावंत स्वयंसेवक कोण?, असा प्रश्न साधारणपणे कोणी विचारत नाही. मात्र, म. गांधी यांच्या हत्येनंतर संघावर आरोप लादले आणि तेव्हा देशाची घटना तयार झालेली नसताना संघावर बंदी लादली गेली. ती एकप्रकारे संघटना स्वातंत्र्याची गळचेपीच होती. त्यावेळेस संघावरील बंदीविरोधात ज्यांनी ज्यांनी सत्याग्रह आणि आंदोलने केली, ते संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, असे निकष राम नाईक यांनी सांगितले. सुंदरलाल राय हेही त्या अर्थाने निष्ठावंत स्वयंसेवक होते, असे ते म्हणाले.