नागपूर : नीट पेपर फुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन उभे झाले. या मागे समाज माध्यमांवर तयार झालेल्या कॉक्रोज पक्षाचे मोठे योगदान राहिले. त्यानंतर विविध मुद्द्यांवर पक्ष तयार करण्याची माहीम सुरू झाली. यातच आरक्षण विरोधी मोहीमही सुरू झाली. परंतु त्याला सर्वच स्तरावरून समर्थन नसल्याचे दिसून आले. यातच काही जणांनी याला विरोधही केला. त्यामुळे दोन्ही बाजूने समर्थक उभे झाल्याचे चित्र आहे. आरक्षणला विरोध होत राहिला आहे. आरक्षण संपविण्याची भाषाही होत आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केले आणि विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले आठवले?
नागपुरात पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, आरक्षण हे संवैधानिक आहे. परंतु ती रद्द करण्याची मागणी होत आहे. इतरांना आरक्षण देण्याची मागणी केली पाहिजे. परंतु आरक्षण रद्द करण्याची भाषा हे संविधानाचे अपमान आहे. त्यामुळे अशांवर राष्ट्रद्रोहासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे. राजकीय आरक्षण हे दहा वर्षाचे आहे. त्यामुळे हे आरक्षण वाढविण्याबाबत संसदेत विधेयक आणण्यात येते. परंतु शैक्षणिक व नोकरीत आरक्षण हे घटनात्मक आहे. ते रद्द करण्याची भाषा करणे योग्य नसल्याचे रामदास आठवले म्हणाले. एससी, एसटीला क्रिमिलेअर लागू करण्यास विरोध असल्याचे ते म्हणाले.
गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे
रामदास आठवले म्हणाले की, एससी, एसटीला आरक्षण मिळण्यासाठी डॉ.बाबासाबेह आंबेडकर यांना मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात २२.५ टक्क आरक्षण आहे. ओबीसींना आरक्षण देण्याचे ते समर्थक होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर २७ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मराठ्यांना १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर केंद्रात ईडब्ल्यूएस आरक्षण दिले आहे. याचा फायदा त्यांनी घेतला पाहिते. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.
राहुल गांधींवर टीका
झारखंडमध्ये पेपर फुटीविरोधात विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंदोलन संपुष्ठात आणण्याबाबत पत्र लिहिले. यावर आठवले म्हणाले की, राहुल गांधीची भूमिका नेहमीच दुटप्पी पाहिली आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या वेळी त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी राजीनामा मागितला नाही. ते फक्त आरोप लावण्याचे काम करतात, असे आठवले म्हणाले.
जागा शुद्धीकरण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय आहेत. त्यांची उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सभा झाली होती. त्यानंतर काही जणांनी सभा जागा शुद्ध करून घेतली. हा प्रकार त्यांचा अपमान असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले.
