नागपूर : पदाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी वादग्रस्त निवृत्त आयएएस अधिकारी अखेर बुधवारी सायंकाळी नागपूरात जेरबंद झाला. त्याच्या विरुद्ध लोकायुक्तांनी २० वर्षांनंतर गुन्हा नोंदवला होता. फसवणूक प्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहत असल्यानं भोपाळ न्यायालयानं त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

रमेश थेटे असं या निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ कॅडरचा हा अधिकारी निवृत्त झाला आहे. त्याने सेवा काळात पदाचा गैरवापर करत पत्नी मंदा थेटेच्या नावाने विविध ६८ बँकांकडून कर्ज घेतलं होते. अल्पावधीतच त्यानं हे कर्ज परत जमा केलं होतं. तपासात उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झालं. त्याआधारे रमेश थेटे व त्याची पत्नी मंदा थेटेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोण आहे हा रमेश थेटे …?

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावर दलितविरोधी असल्याचा आरोप करणारा रमेश थेटे निवृत्त आयएएस अधिकारी आहे. निवृत्त होण्यापूर्वी आयएएस रमेश थेटे यांनं मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना पदोन्नतीबाबत पत्र लिहिलं होतं. मात्र, तरीही त्याला पदोन्नती मिळाली नाव्हती. त्यावरुन दलित असल्याने मला जिल्हाधिकारी बनवण्यात आलं नाही, असा आरोप केला होता.

थेटे याची कोणती वादग्रस्त प्रकरणं कोर्टात…?

रमेश थेटे यानं आयएएस राधेश्याम जुलानियावर जातीवादी असल्याचा आरोप केला होता. तर आयएएस जेएन कॉन्सोटिया यांनी राखीव प्रवर्ग असतानाही आरक्षण आंदोलनाला विरोध केला असा आरोप केला होता. २०२६ मध्ये त्याला आयएएस अधिकारी राधेश्याम जुलानिया यांच्या नेतृत्वाखाली पंचायत, ग्रामविकास विभागात सचिव करण्यात आलं होतं. मात्र, इच्छेप्रमाणे पद न मिळाल्याने त्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.यात त्यानं जुलानिया यांच्यावर जातीयवादी मानसिकतेचा आरोप केला होता. त्याचवेळी आयएएस अधिकारी जेएन कॉन्सोटिया यांच्या संघटनेने आरक्षण वाचवा आंदोलन चालवलं होतं. मात्र, राखीव प्रवर्ग असतानाही थेटे यानं त्यांना विरोध केला होता. निवृत्तीनंतर त्यानं प्रसारमाध्यमांना पत्र लिहून सरकारवर पक्षपाताचा आरोपही केला होता.

लोकायुक्तांनी नोंदवला २० वर्षांनी गुन्हा…?

मध्य प्रदेशातील भोपाळ कॅडरचा आयएएस अधिकारी रमेश थेटे २००१ ते ०२ या कालावधीत जबलपूर महानगरपालिकेत आयुक्त होता. त्यानंतर त्याची रोजगार संचालक आणि प्रशिक्षण पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी त्याची पत्नी मंदा थेटे हिच्या नावावर जबलपूरच्या अनेक बँकांमध्ये ६८ लाख रुपयांचं कर्ज होतं. मात्र, त्यानं कर्जाची रक्कम काही दिवसातच परत केली होती. ज्यात २०१३ मध्ये लोकायुक्त संघटनेनं त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवला. या एफआयआरच्या तपासानंतर जबलपूर युनिटनं लोकायुक्तांच्या विशेष पोलिस युनिटची स्थापना केली. यात थेटेसह त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल आहे.

आयएएस कारकिर्दीत अनेक गुन्हे दाखल …

सेवा काळात वादग्रस्त ठरलेल्या रमेश थेटेवर लोकायुक्तात २० वर्षांनी अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतरही सरकारनं त्याला पोस्टिंग दिली होती. स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणारा थेटे जिल्हाधिकारी पदावर जबाबदारी दिली नसल्याचा त्याचा आरोप आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत २५ खटले दाखल आहेत . कोर्टातून दिलासा मिळाल्यावर त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करून तिला सहआरोपी करण्यात आलं आहे. सध्या थेटे नागपुरात राहत असुन त्यांनं चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. दलितांवर आधारित कंपनी स्थापन करून चित्रपटाची निर्मितीही थेटे यांनं केली आहे असा सुगावा भोपाळच्या पथकाला लागला होता.