वर्धा : राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या खासदारांची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली. त्यात भाजपचे रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते व रामराव वडकुते हे निवडले गेले. तसेच शरद पवार, ज्योती वाघमारे, पार्थ पवार हे अन्य पक्षातर्फे निवडून गेले. एक, दोन वगळता इतर सर्व नावे महाराष्ट्रास परिचित. मात्र त्यातही एक नाव धक्कादायी ठरले. हे कोण, असा प्रश्न आला. त्यासंदर्भात घडलेला एक किस्सा नुकत्याच त्या संबंधित खासदारांनी सांगितल्यानंतर चर्चेत आला आहे.

आर. आर. आबा यांनी हेरले

भाजपने उमेदवारी दिलेले व आता राज्यसभेचे खासदार झालेले रामराव वडकुते हे ते नाव. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. घरची बेताची स्थिती.एमएससी झाल्यावर पुढे काय, असा प्रश्न असतांनाच सरकारी नोकरी पत्करली. एका घटनेने कलाटणी दिली. तत्कालीन औरंगाबाद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासाठी मोर्चा निघाला होता. त्याचे नेतृत्व करणाऱ्या रामराव वडकुते यांना राष्ट्रवादीचे मंत्री आर. आर. आबा पाटील यांनी हेरले. थेट शरद पवार यांची भेट करून दिली.

राज्यमंत्री दर्जा

शरद पवार यांनी मग रामराव यांना शेळी मेंढी विकास मंडळाचे अध्यक्षपद देत राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद बहाल केले. ते परभणी येथील. पण त्यांना हिंगोली येथून लढण्याचा आदेश झाला. त्यात ते पराभूत झाले. पण परत त्यांना याच मंडळचे अध्यक्षपद देवू करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आग्रह करूनही त्यांनी ते पद नाकारले. विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. आमदार झाले. पण एक वर्षाची मुदत शिल्लक असतांनाच रामराव यांनी राजीनामा देत २०१९ साली भाजप मध्ये प्रवेश घेतला.

सात वर्ष विजनवास

काही हमी घेत वडकुते हे भाजपमध्ये आले. पण प्रतीक्षा संपत नव्हती. ७ वर्ष संघर्षात गेली. ते राजकीयदृष्टया आता संपले असे बोलल्या जावू लागले. मात्र पदाशिवाय त्यांचे कार्य सुरूच होते. विधानपरिषदवर त्यांची वर्णी लागणार, अशी चर्चा. पण यादीतून त्यांचे नाव शेवटी कटले. आता राजकीय भविष्य काय, अशी चिंता त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले. अखेर तो दिवस उगवलाच.

मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन

मात्र त्यांच्यावर भाजप नेतृत्व लक्ष ठेवून होतेच. आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या सात दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामराव वडकुते यांना फोन आला. कागदपत्रे तयार ठेवा आणि रामराव आश्चर्यत पडले. कारण ध्यानीमनी नसतांना थेट राज्यसभा मिळणार. हा किस्सा खुद्द रामराव यांनी सांगितला. मुंबईस्थित वर्धेकर पत्रकार विनोद राऊत यांनी खासदार झाल्यानंतर त्यांचा मुंबईत पत्रकार संघातर्फे सत्कार घडवून आणला. यावेळी बोलताना रामराव म्हणाले की फडणवीस यांचा फोन आला आणि चक्कर यायचेच बाकी राहले.

वर्धेशी घट्ट नाते

आता खासदार झालेल्या रामराव वडकुते यांचे वर्धेशी घट्ट नाते राहले आहे. येथील माजी जि. प. सदस्य प्रमोद राऊत यांचा त्यांच्याशी १५ वर्षांपासूनचा घरोबा. रामराव हे आमदार असतांना वर्ध्यात अनेकवार येऊन गेले आहे. येथील काही जि. प. प्रभागात विकास कामांसाठी त्यांनी आमदार निधी पण दिला.

नागपूरला अधिवेशन असले की ते हमखास राऊत यांच्याकडे येत असत. म्हणून येथील अनेकांशी खासदार वडकुते यांचा स्नेह जुळलेला. म्हणूनच मुंबईत झालेल्या त्यांच्या सत्कारास येथील काहींनी हजेरी लावली होती. त्यांनीच वडकुते कसे भावविवश झाले होते, याबद्दल माहिती दिली. त्यांचा वर्ध्यात नागरी सत्कार घेणार असल्याचे राऊत सांगतात.