नागपूर : सिनेरसिकांना रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रामायणाची प्रेक्षकांपुढे येणार असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. याच चित्रपटात रामाची भूमिका करणारा रणबीर कपूर व सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी नागपूरनजिकच्या रामटेक येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने रामटेकवासी त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहे.
‘या’ दिवशी होणार आगमन
‘रामायण’ या चित्रपटाचे प्रमोशन देशभरात सुरू असून धार्मिक स्थळांचाही यात समावेश आहे. नागपूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकचा रामायण कथेशी घनिष्ठ संबंध जोडला जातो. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम रामटेक परिसरात वास्तव्यास होते, अशी श्रद्धा आहे.
येथे श्रीरामाचे भव्य मंदिर असून येत्या ११ ऑक्टोबरला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारा रणबीर कपूर आणि सीतेची भूमिका करणाऱ्या साई पल्लवी रामटेक गडावरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. दिग्दर्शक नितेश तिवारी व लक्ष्मणाचे पात्र साकारणारा रवी दुबेही यावेळी येणार आहे.
मंदिरात रामायण चित्रपटातील गाण्याचे लोकार्पण
चित्रपटातील एका गाण्याचे लोकार्पण या मंदिरात करण्यात येणार आहे. हा दौरा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा एक भाग आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि चित्रपटाच्या अन्य कलाकारांची उपस्थिती होती.
याशिवाय यश रावणाच्या, सनी देओल हनुमानाच्या, अरुण गोविल राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे रामटेक येथे आयोजित रास गरबा महोत्सवातही रणबीर कपूर, साई पल्लवी भाग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामटेकवासींमध्ये उत्साह संचारला आहे.
रामटेकच का निवडले?
वनवास काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण रामटेक येथे चार महिने होते. सीतेने येथे स्वयंपाकघरही तयार केले होते. स्वयंपाक केल्यानंतर तिने स्थानिक ऋषींना भोजन दिले होते, अशी कथा सांगितली जाते. या गोष्टीचा उल्लेख पद्मपुराणातही आहे. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे. त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. रामटेक येथे श्रीराम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट झाली आणि अगस्त्य ऋषींनी याच ठिकाणी श्रीरामांना शस्त्रांचे ज्ञान आणि ब्रह्मास्त्रही दिले, असे सांगितले जाते. त्यामुळे ‘रामायण’ चित्रपटाच्या टीमने येथे भेट देण्याचे ठरविल्याचे समजते.
