नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पारा चांगलाच चढला आहे. तापमान ३७ अंश सेल्सिअसकडे जात आहे. या तापमानापुढे नागपूरकरच नव्हे आगामी ‘रामायण’ चित्रपटातील राम-सीता अर्थात रणबीर कपूर व साई पल्लवीही गारद झाले. तापमानाचे आकडे पाहूनच ‘रामायण’च्या टीमने नागपूर नजिकच्या रामटेक येथील श्रीराम मंदिराचा दौरा टाळल्याचे पुढे आले आहे.
दौऱ्याबाबत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल काय म्हणाले?
आगामी ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर, माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवी, गीतकार डॉ. कुमार विश्वास, लक्ष्मणची भूमिका करणारा अभिनेता रवी दुबे यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम ११ ऑक्टोबर रोजी रामटेक येथे येणार होती. यावेळी चित्रपटातील एका विशेष गाण्याचे लोकार्पणही होणार होते. मात्र सध्या असलेल्या प्रचंड तापमानाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री व रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे रामटेकवासींची निराशा झाली आहे.
आता कधी येणार रणबीर कपूर व साई पल्लवी?
पुढील काळात हा कार्यक्रम रामटेकमध्ये व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रामटेकची शोभायात्रा, काकडआरती किंवा इतर नियोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला रामटेकमध्ये आमंत्रित करून हा सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याबाबत ‘रामायण’ टीमशी चर्चा केली आहे. लवकरच यासंदर्भात पुढील नियोजन करण्यात येईल, असे आशिष जयस्वाल म्हणाले. रामटेकला प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा पौराणिक वारसा लाभला आहे. तसेच अगस्त्य ऋषींनी त्यांना ब्रह्मास्त्र प्रदान केल्याचा उल्लेख रामायणाच्या परंपरेत आढळतो. अशा या पवित्र भूमीवर ‘रामायण’ चित्रपटाच्या टीमचे आगमन होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब होती, असेही त्यांनी नमुद केले. आता हा दौरा लांबल्याने रामटेकवासींना रणबीर कपूर व साई पल्लवीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आगमनामागे होता हा हेतू
या माध्यमातून रामटेकला राष्ट्रीय स्तरावर एक मोठे व्यासपीठ मिळावे, येथील धार्मिक व ऐतिहासिक वारशाची व्यापक प्रसिद्धी व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून रोजगार व आर्थिक समृद्धीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रयत्न असल्याचे जयस्वाल यांनी नमुद केले. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. त्या सर्वांचीच निराशा झाली. आता रामायण टीमच्या नव्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.
