अकोला : विधानसभेत अवैध सावकारी प्रकरणातील चर्चेदरम्यान भाजपचे मुख्य प्रतोद तथा सत्ताधारी पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार विभागातील गैरकारभारावर बोट ठेऊन भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचला. लाच प्रकरणात दोनवेळा पकडूनही पुन्हा त्याच जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती कशी केली जाते? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार आहे की नाही, असे खडे सवाल आमदार सावरकर यांनी उपस्थित केले. सहकार खात्याचे मंत्री पाटील, राज्यमंत्री पंकज भोयर संबंधित अधिकाऱ्याचे काहीही करू शकले नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकाराच्या कर्जामुळे किडणी विकण्याची वेळ आली. या प्रकरणावरील लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना आमदार रणधीर सावरकर यांनी गंभीर मुद्दे मांडले. अकोला जिल्ह्यातील खासगी सावकारी आणि सहकार खात्यातील संगनमत करणारे जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांच्या कारभार आमदार सावरकर यांनी सभागृहात मांडला. अकोला जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांना दोन वेळा लाच प्रकरणात पकडण्यात आले. अन्य ठिकाणी बदली केली जाते.
त्याच्या प्रकरणाची चौकशीची परवानगी नाकारून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी कसे घातले जाते? जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांना एका जीएसटी अधिकाऱ्यासोबत संगनमत करून लाच प्रकरणात पकडल्यानंतर सुद्धा त्यांना अकोल्यातच सहकार विभाग पदस्थापना कशी देते? असे प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केले.
राज्यातील सावकार आणि सहकार खात्यातील अधिकारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट करीत आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार आहे की नाही? त्यांना निलंबित करणार आहे की नाही? असा जाब आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात विचारला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले.
कारवाई करणार का?
नगदी पैसे घेतांना पुरावा असतांना संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सहकार विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी नाकारली. त्यावर मंत्री, राज्यमंत्री कोणीही काहीही करू शकले नाहीत. इतके ‘पॉवरफूल’ ‘डीडीआर’ आहेत, असे टीका आमदार रणधीर सावरकर यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आदेश संबंध अधिकाऱ्याने मॅटमध्ये आव्हान दिले. फेरविचार करण्याचे आदेश दिल्यावर सहकार विभागाकडे पुन्हा फाइल आली. तरी अजूनही बदली झालेली नाही, असे आमदार रणधीर सावरकर म्हणाले. सावकारी प्रकरणात काहीही होत नाही. सरकारचा वचक असला पाहिजे, असे आ. सावरकर यांनी सांगितले.

