नागपूर : सफारी वाहनांनी चारही बाजूंनी घेरलेल्या वाघाचा व्हिडिओ रणथंबोर नॅशनल पार्क मधून व्हायरल झाल्यानंतर जंगल पर्यटन व्यवस्थापनावर संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील याचप्रकारच्या घटनांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जंगलातच वाहतूक कोंडीत अडकला वाघ
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील एका वाघाला सफारी वाहनांनी चारही बाजूंनी घेरल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. अरुंद रस्त्यावर उभ्या असलेल्या वाघाभोवती मोठ्या संख्येने सफारी वाहने जमा झाल्याने वाघाला पुढे जाण्यासाठी जागाच उरली नसल्याचे या व्हिडीओत दिसते. सुरुवातीला नियमित वाघदर्शनाचा क्षण वाटणारी ही घटना काही वेळातच गोंधळात बदलल्याचे दृश्यांत स्पष्ट दिसते. व्हिडीओमध्ये काही जाणते पर्यटक हातवारे करुन वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पर्यटक शांत उभ्या असलेल्या वाघाचे छायाचित्र टिपण्यात मग्न असल्याचेही दिसते. वाघ अत्यंत जवळ आला असतानाही सफारी वाहनांनी त्याला मोकळी जागा दिली नाही. त्यामुळे वाघ चिडलेला दिसून येत आहे.
गर्दीचा वाघावर अनावश्यक ताण
या व्हिडिओनंतर समाजमाध्यमावर संतापाची लाट उसळली. वाघांना सफारी वाहनांनी घेरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. दीघकाळ अशा घटना सातत्याने घडत असतील तर या प्रकारामुळे वन्यजीवांवर अनावश्यक ताण येऊ शकतो. या व्हिडिओत सुरुवातीला माणसांच्या गर्दीत अडकलेला वाघ माणसांपेक्षा अधिक संयमी दिसत होता. मात्र, सफारी वाहने अधिक जवळ आल्यानंतर, मोठ्या संख्येने सफारी वाहने जमा झाल्यानंतर आणि त्याला जाण्यासाठी कुठलाच मार्ग उरला नाही, तेव्हा मात्र वाघ त्रस्त आणि चिडलेला दिसून आला. अशावेळी वाघाकडून हल्ला होण्याची शक्यता देखील असते. पर्यटकांच्या या वर्तणुकीमुळे आणि जिप्सीचालक व गाईड देखील त्यांच्यातच मिसळल्याने जंगल पर्यटनाचा मूळ उद्देशच धोक्यात येत असल्याची खंत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली.
पर्यटन व्यवस्थापन आणि नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील हा व्हायरल व्हिडिओ एकट्या घटनेपुरता मर्यादित नाही. तर देशातील व्याघ्रप्रकल्पांमधील वाढत्या पर्यटन दडपणाचे प्रतिक ठरत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तसेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात देखील यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. यात जिप्सीचालक, गाईड आणि पर्यटकांना देखील काही काळासाठी निलंबित करण्यात आले. एवढेच नाही तर कोर्टाने देखील या घटनांची दखल घेतली. तरीही हा प्रकार थांबलेला नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाघांच्या नैसर्गिक हालचालींना अडथळा ठरणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
