नागपूर : एका विधवा महिलेशी जवळिक साधून एका युवकाने बलात्कार केला. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. विधवेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद साठवणे (गारळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौद्यात राहणाऱ्या पीडित २६ वर्षीय महिला संजना (काल्पनिक नाव) हिच्या पतीचे मार्च २०२१ मध्ये दुर्धर आजाराने निधन झाले. त्यानंतर ती दोन वर्षांच्या मुलीला घेऊन कामाच्या शोधात गुमथळा येथे राहायला गेली. तेथे तिचा मानलेला भाचा सलमान याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसानंतर सलमानचा मित्र आरोपी गोपीचंद साठवणे हा यायला लागला.
त्याने विधवा असलेल्या संजनाच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेत संबंध वाढवले. तिला कामात मदत करणे किंवा तिच्या मुलीला नेहमी खाऊ-चॉकलेट आणून देण्याचे काम करीत होता. त्याने संजनाला जाळ्यात ओढले. तिला प्रेमाची मागणी करीत शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. तिने संबंधासाठी नकार दिला असता त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे संजनाने होकार दिला. सप्टेबर २०२२ मध्ये त्याने तिच्या घरात घुसून बलात्कार केला. त्यानंतर तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी लैंगिक अत्याचार करायला लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून संजनाने पुन्हा मौदा शहर गाठले. तिची प्रकृती बिघडल्याने ती डॉक्टरकडे गेली. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तिने गोपीचंदला फोन करून ही माहिती दिली असता त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. विधवा असून गर्भवती झाल्यामुळे तिची समाजात बदनामी झाली. तिने मौदा पोलिसात गोपीचंदविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी गोपीचंद गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला.



