अकोला : सणासुदीच्या काळात अवकाशात नवी नवलाई अनुभवता येणार आहे. रात्री आकाशात एकाच वेळी तीन चंद्र कोर यासह विविध दुर्मीळ घटना घडणार असून जिज्ञासू खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती विश्वभारती खगोल विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. सणासुदीचा हा आनंद, उत्साहाचा काळ असतो. त्यातच अवकाशात घडणाऱ्या आकर्षक घडामोडी हर्ष वाढवणाऱ्या ठरतात. येत्या काही दिवसांत आकाशात विविध घटना घडणार आहेत.
ग्रहदर्शन, उल्का वर्षाव होणार
आपल्या सूर्यमालेतील नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, असे पाचही ग्रह दर्शनार्थ सज्ज झाले आहेत. १२ सप्टेंबरला सायंकाळी चंद्र आणि बुध ग्रह युती, पश्चिमेला तेजस्वी शुक्र आणि बुध, पूर्वेला शनी ग्रह, पहाटे मंगळ आणि गुरु ग्रहाचे दर्शन होणार आहे. १३ सप्टेंबरला पहाटे ४ वाजतानंतर पूर्वोत्तर आकाशात ‘लिन्सिड्’ उल्का वर्षाव होणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
सोमवारी पश्चिमेला चंद्र कोरीचे आकर्षण
१४ सप्टेंबर, सोमवारी चंद्र आणि शुक्र ग्रहाची पिधानयुती असेल. आपल्या भागात हे दृश्य मुक्त अवस्थेनंतर छानपैकी पाहता येईल. संध्याकाळी ६.२१ वाजता या वेळेस चतुर्थीच्या चंद्राआडून शुक्राची कोर बाहेर येईल. या शुक्र ग्रहाचे ग्रहणानंतर दुर्बिणीतून मनोहारी शुक्र कोर चतुर्थीच्या चंद्रासारखी असेल. एक चंद्राची, दुसरी शुक्राची, तिसरी बुध ग्रहाची प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे अशा तीन कोरी बघता येतील, असे प्रभाकर दोड म्हणाले.
शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ
सध्या शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने या ग्रहाचे दर्शन अधिक सहज, सुलभ आणि रात्रभर होणार आहे. गेल्या वर्षभरात सूर्य, पृथ्वी व शनी यांच्यातील कोनीय स्थितीमुळे सुंदर कडी बघता येईल. ४ ऑक्टोबर रोजी शनी ग्रह त्याच्या अधिक अंतरापेक्षा सुमारे ३० कोटी कि.मी जवळ असल्याने एक महिना पर्वणीच ठरेल, असा विश्वास प्रभाकर दोड यांनी व्यक्त केला.
ढगांनी दाटलेले आकाश आता मोकळे
सध्या पावसाची मोठी दडी मारली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, आता ढगांनी दाटलेले आकाश मोकळे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छ अवकाशात आकर्षक मनोहारी दृश्य बघता येणार आहे. आकाशातील दुर्मीळ, आकर्षक घडामोडी अनुभवून बहुरंगी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राद्वारे केले आहे.
