नागपूर : वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची आता आणखी एक नवीन ओळख समोर येत आहे. या व्याघ्रप्रकल्पात राज्यातील सर्वाधिक वाघ आहेत, पण आता काळ्या म्हणजेच ‘मेलानिस्टिक’ बिबट्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे हा व्याघ्रप्रकल्प आता काळ्या बिबट्यांसाठी ओळखला जाणार, असे संकेत शुक्रवारी झालेल्या काळ्या बिबट्याच्या दर्शनामुळे मिळाले आहेत. वन्यजीव छायाचित्रकार रणवीर सिंग गौतम यांनी हे छायाचित्र घेतले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील केसलाघाट वनक्षेत्रात शुक्रवारी पर्यटकांना सफारीदरम्यान काळा बिबट दिसला. फुलेझरी टेकडी परिसराजवळ हा बिबट दिसताच पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. या व्याघ्रप्रकल्पात काळ्या बिबट्यांची संख्या वाढत आहे आणि आता पर्यटकांनासुद्धा ते दिसत आहे. त्यामुळे वाघासोबतच हे काळे बिबट पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे.  ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सुमारे सातपेक्षा अधिक काळे बिबट आहेत.

पांगली वनक्षेत्रात सर्वाधिक काळे बिबट आहेत. तर पर्यटन क्षेत्रात सुमारे चार वेगवेगळ्या बिबट्यांचे दर्शन झाले आहे. यात एका काळ्या मादी बिबट्यासह तीचे दोन बछडे आणि एक नर काळ्या बिबट्याचा समावेश आहे. तर मदनापूर क्षेत्रजवळ एक आणि झरी कोळसाच्या गाभा क्षेत्रात दोन काळे बिबट आहेत. केसलाघाटचा काळा बिबट हा पांगली-अस्वल चुहा भागातून आला असावा, असा अंदाज वन्यजीव छायाचित्रकार रणवीर सिंग गौतम यांनी वर्तवला आहे. हे दोन्ही क्षेत्र जोडलेले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी आलेल्या एका बेल्जीयम जोडप्याला मे २०१८ मध्ये काळा बिबट पहिल्यांदा आढळला होता.

जंगलसफारी करताना कोळसा वनपरिक्षेत्रात शिवाझरीजवळ त्यांना तो दिसला. तर अशाच प्रकारचा काळा बिबट २०१४ मध्ये कोळसा व मोहर्लीच्या सीमेवरील बोटेझरी भागात ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये आला होता. मात्र, पर्यटक किंवा गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना तो कधी आढळला नाही. त्यामुळे २०१८ मधली नोंद ही पहिली ठरली. ताडोबासह पेंच, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात देखील काळा बिबट दिसला आहे. काळा म्हणजेच ‘मेलानिस्टिक’ बिबट ही वेगळी प्रजाती नाही. कालिकण (मेलॅनिन) हे त्चचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे बिबट काळे दिसतात. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात. बिबट्यांमधील मेलॅनिझम एका उत्परिवर्तनातून उद्भवते. जे मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करणारे जनुक काढून टाकते. यामुळे रंगद्रव्यांची निर्मिती जास्त होते आणि आवरण काळे होते.