नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यजीवप्रेमींसाठी अभ्यासपूर्ण घटना समोर आली. पवनी सफारी मार्गावरील खापरी तलाव परिसरात पर्यटकांना चितळांच्या कळपात एक दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळ दिसून आला. पवनी पर्यटन प्रवेशद्वारावरील पर्यटक मार्गदर्शक दिनेश दाहारे यांनी हे छायाचित्र टिपले.

पर्यटक मार्गदर्शकाची नजर

काळविटांचा रंग बऱ्यापैकी काळा असला तरी चितळाचा रंग काळा नसतो. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी सफारी मार्गावर पर्यटक सफारीसाठी गेले. त्यावेळी खापरी तलाव परिसरात पर्यटकांना चितळांचा कळप दिसला. त्यात एक कृष्णवर्णिय चितळ देखील होते. पर्यटकांना ते लक्षात आले नाही, पण पर्यटक मार्गदर्शक दिनेश दाहारे यांना ते लगेच लक्षात आले. त्यांनी त्याचवेळी त्याचे छायाचित्र घेतले. त्यामुळे फक्त वाघच नाही तर आता काळे चितळ देखील उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याची ओळख ठरणार आहे.

‘मेलॅनिन’ रंगद्रव्यामुळे झाले

नेहमीप्रमाणे तपकिरी रंग व पांढरे ठिपके असलेल्या चितळांच्या कळपात हा गडद काळसर रंगाचा चितळ दिसून आल्याने पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते शरीरात ‘मेलॅनिन’ या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राण्यांचा रंग सामान्यापेक्षा गडद किंवा काळसर दिसतो. चितळांमध्ये मात्र हे रंगवैविध्य दुर्मिळ मानले जाते. अशा दुर्मिळ आणि रंगवैविध्य असलेला वन्यप्राणी आढळणे म्हणजे हे अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचे आणि सुरक्षित अधिवासाचे द्योतक आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती यांनी सांगितले.

अभ्यासकांना चांगली संधी

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचा परिसर दाट जंगल, गवताळ प्रदेश आणि जलस्त्रोतांनी समृद्ध आहे. येथे वाघ आणि बिबट या मांसाहरी प्राण्यांसह चितळ, सांबर यासारखे तृणभक्षी प्राणी देखील आढळतात. या दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळाच्या छायाचित्रामुळे वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या घटनेची नोंद वनविभागाने केली आहे. भविष्यातही या परिसरातील वन्यजीव हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पांढरे हरीण

ताडोबात काळा बिबट आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील कोठारीच्या जंगलात अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ‘अल्बिनोस’ हे पांढरे हरीण तीन वर्षांपूर्वी आढळून आले. पांढरे हरीण दुर्मिळ असून ही हरणांची एक प्रजाती आहे. ज्यामध्ये रंगद्रव्य नसते आणि पूर्णपणे पांढरी त्वचा आणि गुलाबी डोळे, नाक आणि खूर असतात. ‘पाईबाल्ड’ हरीण अधिक सामान्य आहेत. ‘अल्बिनिझम’ अत्यंत दुर्मिळ आहे आणि ३०००० पैकी फक्त एका हरणांमध्ये दिसू शकतो. पृथ्वीवर फारच कमी पांढरे हिरण आढळतात.