scorecardresearch

नागपूर: राष्ट्रसंतांच्या व्याख्यानमालेत आत्मा, परमेश्वर भेटीचा बोलबाला!

‘राष्ट्रसंत व्याख्यानमाले’तून गुरुवारी आत्मा, शरीर, मन आणि परमेश्वराची भेट याचे धडे उपस्थितांना देण्यात आले.

Rashtrasant Tukdoji Maharaj University
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर: ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे…’ असा उपदेश आपल्या भजनांमधून करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठात शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘राष्ट्रसंत व्याख्यानमाले’तून गुरुवारी आत्मा, शरीर, मन आणि परमेश्वराची भेट याचे धडे उपस्थितांना देण्यात आले. विद्यापीठाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा अशी सार्थ अपेक्षा असताना शतकोत्तर वर्षात अशा व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना कुठले धडे दिले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष असून यानिमित्त ‘राष्ट्रसंत व्याख्यानमाला’ या नावाने बारा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे तृतीय पुष्प अमेरिकेतील वेदांत सोसायटी ऑफ प्रॉव्हिडन्सचे अध्यक्ष स्वामी योगात्म्यानंद यांनी गुंफले. प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन’ या विषयावर स्वामी योगात्म्यानंद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मी कोण आहे याचा शोध हा वेदांताचा भागा आहे असे सांगितले. शरीर हे सतत बदलत असते. आपण म्हणजे शरीर नाही. त्यामुळे आपला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. परिणामी आपल्यासाठी लिंगभेद किंवा जातीभेदही नाही. सगळे भेद हे आपोआपच नष्ट होतात.

आणखी वाचा- ‘…तर जुनी पेन्शन योजना लागू करू’, ॲड.आंबेडकरांचा संपकऱ्यांना पाठिंबा

शरीर, मन वेगवेगळे असले तरी त्याचे अस्तित्व एकच आहे. या अस्तित्वाचेच नाव परमेश्वर आहे. तो तुमचाच स्वरूप आहे. तो परमेश्वरच आपल्यात असल्यामुळे तो आहे की नाही हा प्रश्नच उरत नाही, असा उपदेशही स्वामी योगात्म्यानंद यांनी यावेळी केला. आत्मा आणि ईश्वर एकच आहे. तो सर्वांमध्ये आहे. जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक नाही तर जो अंतरात्म्यावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे, असेही ते म्हणाले. आपण आपली संपूर्ण शक्ती कामात आणत नाही. ती चुकीच्या संघर्षामध्ये वाया घालवतो. आपल्या भावनाही नको त्या गोष्टींकडे वळत असतात. यांच्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वेदांतामध्ये उपाय सांगितले आहेत. योग हा त्यावर उत्तम पर्याय आहे. यामुळे वाईट गोष्टींवरील प्रेम हे चांगल्या गोष्टींवर केले जाऊ शकते. यातून स्वत:शी आणि परमेश्वराशी ओळख होते. हेच परिपूर्ण जीवन आहे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. चौधरी यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 12:03 IST