नागपूर : आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात ‘राष्ट्रीय आरक्षण संवर्धन परिषद’ पार पडली. याचे उद्धघाटन उद्योजक गुणवंत देवपारे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार राजकुमार बडोले, वरिष्ठ वकील शैलेश नारनवरे,चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, अरविंद गेडाम, कुलदीप रामटेके, डॉ. संजय रामटेके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. परिषदेत आरक्षणाचे उपवर्गीकरण, शिक्षणातील समान संधी, ईडब्ल्यूएस आरक्षण, अनुसूचित जातीचा निधी इतरत्र वळवणे आदी विषयांवर मान्यवरांनी मत व्यक्त केले.

खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले की, मागासवर्गीयांवर हजारो वर्षे अन्याय झाला. त्यांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. गेल्या ७५ वर्षांत मागासवर्गीयांचा झालेला विकास ‘त्यांना’ खटकतो आहे. त्यामुळेच उपवर्गीकरण आणि इतर माध्यमांतून या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सरकारवर केली. ते म्हणाले की, संविधानामुळे मागासवर्गीयांना अनेक अधिकार मिळालेत. या संविधानामुळे आंदोलन करता येते.

संविधानामुळे हा समाज शिक्षित होत असून प्रश्न विचारतो. हे यांना मान्य नाही. त्यामुळे उपवर्गीकरण आणि इतर विषयांवरून ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संविधानामुळे अधिकार, सन्मान मिळाल्याने ते वाचविण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत बर्वे यांनी व्यक्त केले. वरिष्ठ वकील नारनवरे म्हणाले की, उपवर्गीकरण हे घटनेच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण आले होते. प्रक्रियेनुसार पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण जायला हवे होते. परंतु हे प्रकरण त्यापेक्षा वरिष्ठ खंडपीठाकडे पाठविण्यात आले. हा मोठा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. गुणवंत देवपारे, डॉ. संजय रामटेके यांनीही मार्गदर्शन केले.

एक समाजासाठी उपवर्गीकरण – खामकर

मागासवर्गीच्या अडीच लाख जागा रिक्त आहेत. तर १ लाख कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली नाही. हा मोठा प्रश्न असून त्यावर कुणीच बोलत नाही. उपवर्गीकरणच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु सर्व ५९ जाती एकजुट राहिल्या पाहिजे. तसा प्रयत्न झाला पाहिजे. मातंग समाजाचे असलेले सुनील वारे यांच्या माध्यमातूनच बार्टीने उपवर्गीकरणाचा अहवाल दिला. यात चर्मकार समाजाची लोकसंख्याच खोटे ठरविण्यात आली. फक्त मातंग या एका समाजाचा विचार करून उपवर्गीकरण करण्यात येत असल्याचे चर्मकार महासंघाचे संजय खामकर म्हणाले.

बडालेंची कॉलेजियम पद्धतीवर टीका

राजकुमार बडोले यांनी कॉलेजियम पद्धतीवर तीव्र टीका करत आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. बदर समितीचा अहवाल पूर्णतः फसवा व फसवणूक करणारा आहे. ५९ पैकी ५८ जातींनी आरक्षणात उपवर्गीकरणाची कधीही मागणी केली नाही. उपवर्गीकरण करण्याचा निर्णय एकतर्फी, मनमानीपूर्ण आणि असंवैधानिक असल्याचे ते म्हणाले.