नागपूर: नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राऊळगावजवळील येनवरा येथे एसबीएल एनर्जीचे युनिट आहे. तेथे विविध डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्स्प्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी ३० हून अधिक कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. काही कामगार मलब्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यात नेमकी किती प्राणहानी झाली याचा आकडा समोर आलेला नाही.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचहून अधिक कामगार मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव, तालुका काटोल येथील एसबीएल कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळी दुपारी भेट देणार आहेत.
