rave party busted in nagpur police raid rave party in nagpur zws 70 | Loksatta

तीन हजार तरुण-तरुणींची ‘रेव्ह पार्टी’! ; तब्बल १० लाखांची दारू जप्त; ठाणेदाराची तत्काळ उचलबांगडी

याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वडेट्टीवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तीन हजार तरुण-तरुणींची ‘रेव्ह पार्टी’! ; तब्बल १० लाखांची दारू जप्त; ठाणेदाराची तत्काळ उचलबांगडी
तरुण-तरुणींची ‘रेव्ह पार्टी’

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरसमारी गावाजवळील प्रशस्त गिरनार फार्महाऊस.. रविवारी मध्यरात्रीची वेळ.. अनेक तरुणींचे तोकडय़ा कपडय़ात मित्रांसह नशेच्या कैफात नृत्य.. डीजे- डॉल्बीचा कर्णकर्कश गोंगाट.. महागडय़ा दारूच्या मोठमोठय़ा बाटल्यांची रांग.. अशा झिंगलेल्या मैफिलीत अचानक पोलीस पाहोचले आणि सुमारे ३ हजार तरुण-तरुणींचा हा हैदोस बघून त्यांचे डोक गरगरले.

या पार्टीची पोलीस उपायुक्त गजाजन राजमाने यांना माहिती मिळाली. त्यांनी लगेच छापा घातला आणि जवळपास २ ते ३ हजार तरुण-तरुणींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईची शहरभर चर्चा असून ही रेव्ह पार्टीच असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांची संपूर्ण शहरात रात्रगस्त होती.  गस्त करीत असताना खसरमारी येथील गिरनार फॉर्म हाऊसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती त्यांना मिळाली.

हिंगणा पोलिसांना न कळवता  राजमाने यांनी गिरनार फॉर्महाऊसवर छापा घातला. त्यावेळी जवळपास २ ते ३ हजार तरुण-तरुणी पार्टीत सहभागी असल्याचे दिसून आले. काहीजण मद्याच्या आणि मादक पदार्थाच्या अंमलाखाली डीजेच्या तालावर थिरकत होते.

पार्टीत सहभागी असलेल्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता रामदासपेठ येथील छगन कुवजीभाई पटेल (६५) आणि शिव वडेट्टीवार (३२) रहाटे कॉलनी यांनी या पार्टीचे आयोजन केल्याचे समजले. पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने धाड घातल्यानंतर ही माहिती धंतोली पोलिसांना देऊन त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

पोलीस घटनास्थळी असतानाच एका पिकअप व्हॅनमध्ये महागडय़ा दारूच्या बाटल्या आल्या. पोलिसांनी या पार्टीतून मोठय़ा प्रमाणात दारू, डीजे साहित्य, एलएडी असा १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वडेट्टीवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद

प्रामुख्याने मुंबई आणि पुण्याकडे रेव्ह पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात. आता त्याचे लोण नागपूपर्यंत पसरल्याचे या प्रकारने स्पष्ट झाले आहे. शहराबाहेरील फॉर्महाऊसवर स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने या पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात. त्यामुळे पोलीस देखील याच पाटर्य़ाकडे दुर्लक्ष करून त्याला पाठबळ देतात. असाच ठपका ठेवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हिंगण्याचे ठाणेदार बळीरामसिंह परदेशी यांची तत्काळ उचलबांगडी करून त्यांच्या जागी इंदोरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांची नेमणूक केली.

आयोजक कॉँग्रेस पदाधिकारी?

गिरनार फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीचे आयोजन यूथ काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीतील एका मोठय़ा पदाधिकाऱ्याने केले होते. तो युवा पदाधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाचा सरपंच असल्याची माहिती आहे. मात्र, िहगण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल महाजन यांना विचारणा केली असता आयोजकांच्या राजकीय पदाबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2022 at 01:02 IST
Next Story
झोपडपट्टय़ांमध्ये घट, पण तेथील लोकसंख्येत वाढ ; राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा अहवाल